नागपुरात सराफांची ‘एकल’ दुकाने उघडली, इतवारी मुख्य बाजार बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 01:28 AM2020-05-27T01:28:15+5:302020-05-27T01:30:38+5:30
दोन महिन्यांपासून सोन्या-चांदीची दुकाने बंद असल्याने सराफा व्यावसायिकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. रेड झोनमुळे दोन महिन्यानंतर केवळ ‘स्टॅण्डअलोन’ अर्थात एकल दुकाने उघडण्यास मनपाने परवानगी दिली आहे. त्यानुसार मंगळवारपासून नागपुरात पाच मोठे शोरूम आणि २५ लहानमोठी दुकाने सुरू झाली आहेत. उर्वरित दुकाने बंद आहेत. मंगळवारी २४ कॅरेट सोने ४७,५०० रुपये आणि चांदी प्रति किलो ४८ हजार रुपये भाव होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन महिन्यांपासून सोन्या-चांदीची दुकाने बंद असल्याने सराफा व्यावसायिकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. रेड झोनमुळे दोन महिन्यानंतर केवळ ‘स्टॅण्डअलोन’ अर्थात एकल दुकाने उघडण्यास मनपाने परवानगी दिली आहे. त्यानुसार मंगळवारपासून नागपुरात पाच मोठे शोरूम आणि २५ लहानमोठी दुकाने सुरू झाली आहेत. उर्वरित दुकाने बंद आहेत. मंगळवारी २४ कॅरेट सोने ४७,५०० रुपये आणि चांदी प्रति किलो ४८ हजार रुपये भाव होते.
रेड झोनमुळे इतवारी मुख्य सराफा बाजार आणि कमाल चौकातील दुकाने बंद आहेत. मात्र लक्ष्मीनगर येथील रोकडे ज्वेलर्स, शंकरनगर चौकातील दास ज्वेलर्स, करण कोठारी ज्वेलर्स शोरूम सुरू झाले असून खरेदीला प्रतिसाद मिळत आहे. रोकडे ज्वेलर्सचे संचालक आणि सोना चांदी ओल कमिटीचे सचिव राजेश रोकडे म्हणाले, सराफा व्यापारी प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यास सज्ज आहेत. मनपा आयुक्तांनी दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी. या संदर्भात मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे.
मार्च महिन्याच्या शेवट्या आठवड्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सराफा दुकाने बंद आहेत. त्यामुळे सोने खरेदीसाठी मुहूर्त असलेले गुढीपाडवा, अक्षयतृतीया या सणांना सोने-चांदीची विक्री झालीच नाही. त्यातच लग्नसराई आणि इतर कार्य बंद असल्याने सोने खरेदी बंद आहे. त्यामुळे सराफा व्यावसायकांना आर्थिक फटका बसला आहे. शिवाय स्थानिक कारागिरांचा रोजगार हिरावला आहे. आता दुकाने सुरू करण्यासाठी १ जूनची वाट पाहावी लागेल. सुरू झालेल्या शोरूमचे संचालक शासनाच्या नियमांचे पालन करीत आहेत. कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर आणि हॅण्डग्लोव्हज दिले आहेत. बाजार सुरळीत होण्यासाठी किती दिवस लागतील, हे सांगणे कठीण आहे, पण लोकांनी नियमाचे पालन केले तरच बाजार सुरळीत होईल, अशी अपेक्षा सराफांनी व्यक्त केली.
लॉकडाऊनच्या काळात अनेक सराफा व्यावसायिकांनी ऑनलाईन सोने खरेदीच्या आॅफर दिल्या होत्या. मात्र ग्राहकांना सोने प्रत्यक्ष हाताळण्याची सवय असल्याने अनेकांनी सराफा बाजार उघडल्यानंतरच सोने खरेदीला पसंती दिली आहे. गुढीपाडवा, अक्षयतृतीयेला अनेक सराफांनी नियमित ग्राहकांना घरपोच सेवा देण्याचे नियोजन केले होते. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.