नागपूर स्मार्ट सिटी क्षेत्रात १२०० बांधकामे तुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 10:18 AM2018-04-26T10:18:47+5:302018-04-26T10:18:57+5:30
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत १२०० बांधकाम तुटणार असून ७४५ मालमत्ता काही प्रमाणात प्रभावित होणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पूर्व नागपुरातील पारडी, पुनापूर, भरतवाडा व भांडेवाडी परिसरातील एरिया बेस डेव्हलपमेंट करण्यात येणार आहे. यासाठी सिटी सर्व्हे क्रमांकाच्या आधारावर प्रारूप प्रकाशित करण्यात आले आहे. यावर नागरिकांना आक्षेप व हरकती ७ मे पर्यंत नोंदविता येतील. एरिया बेस डेव्हलपमेंटमध्ये रस्ते, उद्यान, बाजार आदी विकास कामे केली जाणार आहेत. यात १२०० बांधकाम तुटणार असून ७४५ मालमत्ता काही प्रमाणात प्रभावित होणार आहेत. या प्रकल्पाचा या परिसरातील २५ हजारांहून अधिक लोकांना लाभ होणार आहे.
अहमदाबादच्या एचपीसी डिझाईन, प्लानिंग अॅन्ड मॅनेजमेंट प्रा.लिमिटेडतर्फे निवासी संकुलाचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या योजनेत ३० मीटर, २४ मीटर, १८ व ९ मीटर रुंदीच्या रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येईल. तसेच उद्यान, शैक्षणिक संस्था, रुग्णालये, व्यावसायिक संकुल अशा विकास कामांसाठी जमिनी अधिग्रहित करण्यात येणार आहे. यासाठी जमीन मालकाला मोबदला दिला जाणार आहे. प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्यांचे नवीन ठिकाणी पुनर्वसन करण्याची योजना आहे. लकडगंज झोन व महापालिका मुख्यालयात स्मार्ट सिटी विभागातर्फे स्मार्ट सिटी प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. ज्यांच्या जमिनी वा जागा यात जाणार आहेत त्यांनी आवश्यक शुल्क भरून आपल्या जमिनीची माहिती प्राप्त करून घ्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे. सिटी सर्वे विभागाच्या रेकॉर्डनुसार आराखडा तयार करण्यात आला आहे. यामुळे ज्या जमीन मालकांनी नावे सिटी सर्वे विभागाकडे नोंद केलेली नाही. अशा लोकांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्प क्षेत्रात नासुप्र वा महापालिकेतर्फे मंजूर करण्यात आलेल्या ले-आऊ टवर याचा कोणताही प्ररिणाम होणार नाही. खाली प्लॉट टीपी योजनेंतर्गत जमीन मालकांच्या अनुमतीने घेतली जात आहे. प्रकल्पामुळे बाधित होणाºयांचे नवीन ठिकाणी पुनर्वसन करण्यात येईल. या भागाचा नियोजनबद्ध विकास क रण्यात येणार आहे.
डॉ. रामनाथ सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी प्रकल्प