नागपूर स्मार्ट सिटी : संचालक मंडळाची बैठक वादळी ठरण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 11:34 PM2020-07-07T23:34:17+5:302020-07-07T23:35:31+5:30

नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सत्तापक्षाने पुन्हा एकदा आयुक्त तुकाराम मुंढे यांची कोंडी करण्याची तयारी सुरू केली आहे. १० जुलैला संचालक मंडळाची बैठक होत आहे.

Nagpur Smart City: Board of Directors meeting signals storm | नागपूर स्मार्ट सिटी : संचालक मंडळाची बैठक वादळी ठरण्याचे संकेत

नागपूर स्मार्ट सिटी : संचालक मंडळाची बैठक वादळी ठरण्याचे संकेत

googlenewsNext
ठळक मुद्देमहापौरांनी निदेशकांना पाठवले पत्र : आयुक्तांनी अधिकाऱ्यांची घेतली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सत्तापक्षाने पुन्हा एकदा आयुक्त तुकाराम मुंढे यांची कोंडी करण्याची तयारी सुरू केली आहे. १० जुलैला संचालक मंडळाची बैठक होत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर संदीप जोशी व सत्ता पक्षनेता संदीप जाधव यांच्यातर्फे संचालक मंडळातील निदेशकांना पत्र पाठवून नियम व कायद्याच्या अधीन राहून निर्णय घ्यावा, असे आवाहन केले आहे. दुसरीकडे आयुक्त मुंढे यांनी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक घेऊन आवश्यक माहिती संकलित करण्याला सुरुवात केली. सत्तापक्ष व आयुक्त यांच्यात सुरू असलेला संघर्ष लक्षात घेता संचालक मंडळाची बैठक वादळी ठरण्याचे संकेत आहेत.
विशेष म्हणजे तीन महिन्यानंतर आयोजित महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्तापक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व नगरसेवकांनी सलग चार दिवस स्थगन प्रस्तावावर चर्चा करताना आयुक्तांवर आरोप करून त्यांना धारेवर धरले. आयुक्तांनीही आपल्या शैलीत याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आयुक्त व सत्तापक्ष यांच्यातील संघर्ष अजूनही कायम आहे.
स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. संचालक मंडळात महापौर, सत्ता पक्षनेता, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेता, बसपा गटनेत्या, शिवसेना नगरसेवक यासोबतच पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, नासुप्र सभापती, मनपा आयुक्त, केंद्र सरकारचे अपर सचिव (वित्त) दीपक कोचर, स्मार्ट सिटीचे चेअरमन प्रवीण परदेशी आदींचा समावेश आहे. या सोबतच दोन स्वतंत्र सदस्य जयदीप शाह व अनिरुद्ध सेनवाई यांचा समावेश आहे.
मंगळवारी स्मार्ट सिटीचे निदेशक म्हणून महापौर संदीप जोशी व सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी स्मार्ट सिटीच्या निदेशकांना पत्र पाठवले. यात नियम व कायद्याच्या अधीन राहून बैठकीत निर्णय व्हावा. द्वेष भावनेतून कुठल्या एका पक्षाच्या बाजूने निर्णय झाला तर तो बेकायदेशीर होईल, असे यात नमूद केले आहे.
दुसरीकडे आयुक्त मुंढे यांनी स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन संचालक मंडळाच्या बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. आपली बाजू भक्कम करण्यासाठी आवश्यक दस्तऐवज जमवले. यावरून संचालक मंडळाची बैठक वादळी होण्याची शक्यता आहे.

गप्प बसणार नाही, कोर्टात जाऊ- जोशी
संचालक मंडळाच्या बैठकीत नियमाच्या अधीन राहून निर्णय घ्यावा, असे निदेशकांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. कायद्यानुसार स्मार्ट सिटीचे सीईओ पूर्णकालीन पद आहे. दुसऱ्या पदावर कार्यरत असलेली व्यक्ती या पदावर राहू शकत नाही. याचा विचार करता आयुक्त मुंढे सीईओ होऊ शकत नाहीत. मुंढे आयुक्त असल्याने ते निदेशक होतील. यासाठी संचालक मंडळाची परवानगी आवश्यक आहे. मुंढे यांनी सीईओ म्हणून अनियमितता केली आहे. यासंदर्भात न्यायालयात जाऊ, असा इशारा संदीप जोशी यांनी दिला.

Web Title: Nagpur Smart City: Board of Directors meeting signals storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.