Nagpur South Election Results : अटीतटीच्या लढतीत मोहन मते यांनी दक्षिणचा गड राखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 02:13 AM2019-10-25T02:13:14+5:302019-10-25T02:13:56+5:30

Nagpur South Election Results 2019 : Mohan Mate Vs Girish Pandav, Maharashtra Assembly Election 2019

 Nagpur South Election Results: Mohan Mate Vs Girish Pandav | Nagpur South Election Results : अटीतटीच्या लढतीत मोहन मते यांनी दक्षिणचा गड राखला

Nagpur South Election Results : अटीतटीच्या लढतीत मोहन मते यांनी दक्षिणचा गड राखला

googlenewsNext
ठळक मुद्देमतमोजणीत दोनदा माघारल्याने वाढली होती उत्सुकता

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण नागपूर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासून तर दहाव्या फेरीपर्यंत भाजपाचे उमेदवार मोहन मते आघाडीवर होते. मात्र त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव व मते यांच्या मतात फारसे अंतर नव्हते. अकराव्या फेरीत पांडव आघाडीवर आले. मात्र त्यानंतरच्या सहा फेरीत मते यांनी आपली आघाडी कायम राखली. एकोणवीसाव्या फेरीत पांडव पुन्हा आघाडीवर आल्याने भाजप कार्यकर्त्यांत धाकधूक वाढली होती. शेवटच्या फेरीपर्यंत अटीतटीच्या लढतीत अखेर मते यांनी बाजी मारली. त्यांचा ३,९८७ मतांनी विजय झाला. त्यांना ८४,३३९ मते मिळाली, तर गिरीश पांडव यांना ८०,३८० मते मिळाली.
या मतदार संघात एकूण १७ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी बहुजन समाज पक्षाचे शंकर थूल ५,६४९ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेश पिसे यांना फक्त ५,५३५ मते मिळाल्याने चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागत आहे. अपक्ष उमेदवार सतीश होले यांना ४,५९९, किशोर कुमेरिया यांना ४,४०५ तर प्रमोद मानमोडे यांना ४,२६० मते मिळाली. या मतदार संघामध्ये एकूण १ लाख ९३ हजार ३४२ मतदान झाले. २२९१ मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला, तर १०५३ पोस्टल मतदानांची मोजणी झाली. त्यापैकी १९८ मतदान अवैध ठरले. यातही मोहन मते आणि गिरीश पांडव यांच्यातच थेट लढत झाली.
सीताबर्डी येथील सांस्कृतिक बचत भवन येथे झालेल्या मतमोजणीत सकाळी पहिल्या फेरीपासूनच मते यांनी मतांची आघाडी घेतली. पहिल्या फेरीत ३,७६५ मते मिळवून त्यांनी आपल्या विजयाचे संकेत दिले. या फेरीत पांडव यांना ३,४५५ मते मिळाली. दुसऱ्या फेरीत मते यांना ७,८५८ मते तर पांडव यांना ५,२७० मते मिळाली. दहाव्या फेरीपर्यंत मोहन मते यांची आघाडी कायम होती. मात्र अकराव्या फेरीत पांडव यांनी आघाडी घेतली. या फेरीअखेर मोहन मते यांना ३२,९६० तर पांडव यांना ३३,३३० मते मिळाली. या फेरीत पांडव यांनी ३७० मतांची आघाडी घेतल्याने निकालाची उत्सुकता वाढली होती.
मात्र बाराव्या फेरीत मते यांनी पुन्हा ५३२ मतांनी आघाडी घेतली. अठराव्या फेरीअखेरीस मोहन मते यांना ५७,५८५ मते मिळाली, तर पांडव यांना ५७,५०६ मते मिळाली. मते यांची आघाडी कमी झाल्याने मते यांच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. त्यातच एकोणवीसाव्या फेरीत मोहन मते पुन्हा माघारले. त्यांना ६०,८९२ मते मिळाली तर पांडव यांना ६१,४२१ मते मिळाली. पांडव या फेरीअखेरीस ५२९ मतांनी आघाडीवर होते. मात्र त्यानंतरच्या प्रत्येक फेरीत मोहन मते यांना आघाडी मिळत गेली. अखेरच्या फेरीत मते यांना ८४,३३९ मते मिळाली. तर पांडव यांना ८०,३८० मते मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बिजवल यांनी मते यांचा ३,९८७ मतांनी विजयी झाल्याचे जाहीर केले. अटीतटीच्या लढतीत मोहन मते यांनी भाजपचा दक्षिणचा गड कायम राखला.

पांडव यांची फेरमतमोजणीची मागणी
मतमोजणीच्या फेरीअखेर जाहीर करण्यात आलेली मतदानाची आकडेवारी व निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर टाकण्यात आलेले मतदानाचे आकडे यात तफावत आहे. वेबसाईटवर दक्षिण नागपूर मतदार संघातील मतांचे आकडे स्पष्ट दिसत नसल्याचा आक्षेप घेत काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बिजवल यांच्याकडे फेरमतमोजणीची मागणी केली. निवडणूक आयोगालाही यासंदर्भात अवगत केले. मात्र बिजवल यांनी ही मागणी फेटाळली. मतमोजणी झाल्यानंतर पांडव यांनी हा आक्षेप नोंदविला. परंतु याला ठोस आधार नसल्याने ही मागणी फेटाळल्याचे बिजवल यांनी सांगितले.

सहा ईव्हीएमची शेवटी मतमोजणी
मतदानाच्या वेळी मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी मतदान संपल्यानंतर ईव्हीएमची बटन बंद केली नव्हती. त्यामुळे तसेच एका ईव्हीएमवर मॉकपोल घेतल्यानंतर डिलीट न करताच मतदान करण्यात आले होते. मतमोजणीच्या वेळी हा प्रकार निदर्शनास आला. उमेदवारांच्या प्रतिनिधींना याची जाणीव करून देण्यात आली. शंका निरसन केल्यानंतर यामुळे सहा ईव्हीएमवरील मतमोजणी शेवटी करण्यात आली.

 

 

Web Title:  Nagpur South Election Results: Mohan Mate Vs Girish Pandav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.