नागपूर; भाडे थकल्याने भरलीच नाही मनस्क विद्यार्थ्यांची शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 11:08 AM2018-06-27T11:08:47+5:302018-06-27T11:11:26+5:30
सरकार एकीकडे दिव्यांगांना प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबवित आहे तर दुसरीकडे शाळेचे भाडे शासन देऊ न शकल्याने दिव्यांग गटातील मनस्क विद्यार्थी शाळेपासून वंचित राहत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सरकार एकीकडे दिव्यांगांना प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबवित आहे तर दुसरीकडे शाळेचे भाडे शासन देऊ न शकल्याने दिव्यांग गटातील मनस्क विद्यार्थी शाळेपासून वंचित राहत आहे. अयोध्यानगर येथे विदर्भ जीवन विकास संस्थेद्वारा संचालित दुर्बल व मनस्क तथा मतिमंद विद्या निकेतन ही शाळा सुरू करण्यात आली होती. ही शाळा भाड्याच्या घरात असल्याने घरमालकाने भाडे थकल्यामुळे शाळेला कुलूप ठोकले. त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी पहिल्याच दिवशी शाळेत पोहचूनही शाळा भरू शकली नाही.
या शाळेत ६५ मतिमंद विद्यार्थी शिक्षण घेतात. समाजकल्याण विभागातर्फे शाळेला भाड्याचे अनुदान प्राप्त होते. किरायाच्या संदर्भात घरमालकाशी करार सुद्धा झाला आहे. परंतु गेल्या काही महिन्यापासून किरायाचे अनुदान समाजकल्याण विभागाकडून शाळेला न मिळाल्याने घरमालकाचे भाडे थकले आहे. घरमालकाशी झालेला भाडेकरार हा आॅगस्ट महिन्यापर्यंत असला तरी, घरमालकाने ३ मे रोजी शाळेला कुलूप ठोकून दुरूस्तीचे काम सुरू केले. शाळेचे बांधकाम पाडण्यात आले. शाळेचे बॅनर काढून टाकले. शाळेला कुलूप ठोकल्याने कार्यालयीन बायोमेट्रिक मशीन, पगार बिल कागदपत्रे, मस्टर रजिस्टर, वेतनेतर अनुदान, शाळेच्या भाडे पावत्या, विद्यार्थ्यांची कागदपत्र सर्व अडकून पडले आहे. या संदर्भात शाळा व्यवस्थापनाने हुडकेश्वर पोलिसात सुद्धा तक्रार दाखल केली आहे. पण कुठलाच फायदा झाला नाही. यासंदर्भात समाजकल्याण विभागाला सुद्धा कळविण्यात आले आहे. आता तर शाळेचे स्लॅप सुद्धा तोडण्यात आल्याने शाळा कुठे भरणार असा प्रश्न शाळा व्यवस्थापनापुढे आहे.