Nagpur: आंदोलनाच्या अडथळ्यातही लालपरीची घोडदाैड सुरूच, ९० टक्के फेऱ्या सुरळीत; डिझेलची मात्र टंचाई

By नरेश डोंगरे | Published: January 2, 2024 08:11 PM2024-01-02T20:11:47+5:302024-01-02T20:14:09+5:30

Nagpur: ट्रकचालकांच्या संपामुळे अनेक सेवा विस्कळीत झाल्या असल्या तरी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसची आजच्या घडीला स्थिती ऑल वेल आहे. नागपूर विभागातील ९० टक्के बसेस रस्त्यावर धावत असल्याचा दावा एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे.

Nagpur: ST Bus run's continues despite the disruption of the agitation, 90 percent of the rounds are smooth; But shortage of diesel | Nagpur: आंदोलनाच्या अडथळ्यातही लालपरीची घोडदाैड सुरूच, ९० टक्के फेऱ्या सुरळीत; डिझेलची मात्र टंचाई

Nagpur: आंदोलनाच्या अडथळ्यातही लालपरीची घोडदाैड सुरूच, ९० टक्के फेऱ्या सुरळीत; डिझेलची मात्र टंचाई

- नरेश डोंगरे 
नागपूर - ट्रकचालकांच्या संपामुळे अनेक सेवा विस्कळीत झाल्या असल्या तरी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसची आजच्या घडीला स्थिती ऑल वेल आहे. नागपूर विभागातील ९० टक्के बसेस रस्त्यावर धावत असल्याचा दावा एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे. तथापि, अशीच स्थिती राहिली तर पुढच्या काही तासांत डिझेलची टंचाई निर्माण होऊ शकते आणि एसटी बसेस जागच्या जागी थांबू शकतात, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली आहे.

सोमवारपासून ट्रकचालकांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. पेट्रोल, डिझेल, दुध, अन्नधान्य, भाजीपालासह अनेक जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा प्रभावित झाल्याने थेट सर्वसामान्यांना फटका बसत आहे. या सर्वांमधून लालपरीचा मार्ग मात्र मोकळा आहे. सोमवारी पहिल्या दिवशी ट्रकचालकांच्या आंदोलनाने एसटी सेवा प्रभावित झाली. सुमारे दीड लाख प्रवाशांना त्याचा फटका बसला. मात्र, आज मंगळवारी लालपरीचा गावोगावचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे नागपुरातील ३९० एसटी बसेस सकाळपासून सुरळीत धावत असल्याची माहिती एसटीचे विभागीय उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभणे यांनी लोकमतला दिली.

दुसरीकडे एसटी बसेस जरी धावत असल्या तरी त्यांचा प्रवास उधारीच्या डिझेलवर सुरू आहे. ट्रकचालकांनी त्यांची वाहने उभी केल्यामुळे जागोजागचे पेट्रोल-डिझेल पंप कोरडे झाले आहे. त्यामुळे एसटीकडे जेवढा साठा होता, तो आज रात्रीपर्यंत पुरेल असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील बसेसमध्ये आज वर्धा, चंद्रपूर, भंडारा आदी ठिकाणच्या विविध डेपोमधील डिझेल उधारित घेऊन दिवस भागविण्यात आला. पुढच्या काही तासांत त्यांच्याकडील डिझेलचा साठाही संपणार, त्यामुळे नंतर काय, असा प्रश्न आहे.

परप्रांतात जाणाऱ्या गाड्यांना फटका
नागपूरहून परप्रांतात जाणाऱ्या एसटी बसेसना मात्र आंदोलनाचा फटका बसला आहे. मध्य प्रदेशातील शिवनी, छिंदवाडा, इंदोर, पिपळा नारायणपूर येथे जाणाऱ्या बसेस आंदोलनामुळे तिकडे गेल्या नाहीत. दसुरे म्हणजे, छत्तीसगडमधील राजनांदगावला जाणाऱ्या फेऱ्याही चिचोली बॉर्डरवर आंदोलन सुरू असल्यामुळे थांबल्या. यातील एक फेरी देवरीपर्यंत पोहचली. दुसरी मात्र रद्द करण्यात आली. विदर्भातील मोहगावच्या दोन आणि पांढरकवडा येथे जाणाऱ्या दोन फेऱ्यासुद्धा रद्द करण्यात आल्याचे एसटीचे गणेशपेठ आगारप्रमूख गाैतम शेंडे यांनी सांगितले.

Web Title: Nagpur: ST Bus run's continues despite the disruption of the agitation, 90 percent of the rounds are smooth; But shortage of diesel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.