नागपुरात एसटीच्या प्रवाशांची खासगीकडून पळवापळवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 08:26 PM2020-10-10T20:26:02+5:302020-10-10T20:27:55+5:30
Bus passengers issue , Nagpur news सहा महिने लॉकडाऊन झाल्यानंतर एसटी बसेसची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरु झाली आहे. परंतु खासगी वाहनांचे दलाल बसस्थानकावर येऊन एसटीचे प्रवासी पळवित असल्यामुळे एसटीचे आर्थिक नुकसान होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सहा महिने लॉकडाऊन झाल्यानंतर एसटी बसेसची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरु झाली आहे. परंतु खासगी वाहनांचे दलाल बसस्थानकावर येऊन एसटीचे प्रवासी पळवित असल्यामुळे एसटीचे आर्थिक नुकसान होत आहे.
कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. सहा महिने एसटी बसेस ठप्प झाल्या होत्या. दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या आदेशावरून एसटी महामंडळाने परप्रांतातील कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडले. त्यानंतर केवळ २२ प्रवासी घेऊन बसेस सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. काही दिवसानंतर पूर्ण क्षमतेने बसेस सुरु झाल्या. परंतु कोरोनामुळे आवश्यक असले तरच प्रवासी घराबाहेर पडत आहेत. पूर्ण क्षमतेने बसेस सुरु झाल्या तरी हवे तेवढे प्रवासी एसटीला मिळत नसल्याची स्थिती आहे. अशा स्थितीत खासगी वाहनांचे एजंट बसस्थानकात प्रवेश करून एसटीचे प्रवासी पळवित असल्याची माहिती आहे. त्यामुळे एसटीचे आर्थिक नुकसान होत आहे. आधीच कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी एसटी महामंडळाकडे पैसे शिल्लक नाहीत. खासगी वाहनांचे एजंट प्रवासी पळवित असल्यामुळे एसटी महामंडळ आणखीनच अडचणीत येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
१२ नियंत्रकांची नियुक्ती
खासगी वाहनांचे एजंट एसटीचे प्रवासी पळवित असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या बंदोबस्तासाठी बसस्थानकावर १२ नियंत्रकांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे दलाल आढळताच त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग