नागपूर; विद्यार्थ्यांना मिळणार ‘आॅनलाईन’ धडे; पुढील वर्षापासून ‘स्वयम्’ची अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 01:40 PM2018-09-10T13:40:08+5:302018-09-10T13:41:11+5:30
बदलत्या काळासोबतच ‘आॅनलाईन’ अभ्यासक्रमांची मागणीदेखील वाढीस लागली आहे. विद्यार्थ्यांना ‘आॅनलाईन’ माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ‘युजीसी’तर्फे ‘स्वयम्’च्या रुपाने संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बदलत्या काळासोबतच ‘आॅनलाईन’ अभ्यासक्रमांची मागणीदेखील वाढीस लागली आहे. विद्यार्थ्यांना ‘आॅनलाईन’ माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ‘युजीसी’तर्फे ‘स्वयम्’च्या रुपाने संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याबाबत सुरुवातीला उदासीन असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अखेर पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी ‘मूक’ (मॅसिव्ह ओपन आॅनलाईन कोर्सेस) अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे दर्जेदार प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना एका ‘क्लिक’वर उपलब्ध होणार आहेत हे विशेष.
सबकुछ हायटेक’च्या जमान्यात शिक्षणक्षेत्रातदेखील अभ्यासाची प्रणाली बदलत चालली आहे. ‘स्वयम्’च्या माध्यमातून संचालित ‘मूक’ देशभरातील विद्यापीठांनी २०१८-१९ या शैक्षणिक सत्रापासून आपल्या अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट करुन घ्यावे, असे निर्देश ‘युजीसी’तर्फे देण्यात आले होते. मात्र सुरुवातीला नागपूर विद्यापीठाने याबाबत फारसा रस दाखविला नाही. मात्र या अभ्यासक्रमांची उपयुक्तता व कौशल्यविकासावर असणारा भर यामुळे विद्यापीठाने याबाबतील सकारात्मक भूमिका घेतली आहे. या वर्षीपासून हे अभ्यासक्रम सुरू करणे शक्य नाही. मात्र सर्व प्राधिकरणे अस्तित्वात आली असल्यामुळे नवीन अभ्यासक्रमांचे प्रारुप तयार करण्यासाठी सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठाकडून लवकरच बैठकांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाविद्यालयीन पातळीवर ‘मेंटॉर’ नेमणार
‘स्वयम्’अंतर्गत येणारे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विद्यापीठाला महाविद्यालयांचा सहभाग आवश्यक आहे. त्यामुळेच महाविद्यालयीन पातळीवर ‘मेंटॉर’ नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे अभ्यासक्रम ‘सीबीसीएस’अंतर्गत येणार असल्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे ‘आॅनलाईन’ अभ्यासक्रम पोहोचविण्याची जबाबदारी या ‘मेंटॉर’कडे राहणार आहे. विद्यापीठाकडून यासाठी समन्वयक राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. याबाबत कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना विचारणा केली असता विद्यापीठ पुढील वर्षीपासून हे अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता नियमित प्राधिकरणे अस्तित्वात आली आहेत. हे अभ्यासक्रम ही काळाची आवश्यकता आहे व यामुळे विद्यार्थ्यांसमोर अनेक पर्याय उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.
काय आहे ‘स्वयम’?
केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद यांच्याकडून संधी, समानता आणि गुणवत्ता या शिक्षणप्रणालीच्या तीन आधारभूत तत्त्वांवर आधारित ‘स्वयम’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. ‘आॅनलाईन’ माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार अभ्याससाहित्य घरबसल्या उपलब्ध करुन देणे हा यामागील महत्त्वचाा उद्देश आहे. अगदी नववीपासून ते पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी येथे विविध ‘मॉड्युल्स’ उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे देशभरातील हजारहून अधिक अनुभवी शिक्षक व प्राध्यापक हे ‘मूक’ अभ्यासक्रम व अभ्याससाहित्य तयार करणार आहे.
यांचा असणार समावेश
- ‘व्हिडीओ लेक्चर्स’
- ‘आॅनलाईन’ अभ्याससाहित्य
- ‘आॅनलाईन’ नोंदणी
- स्वअध्ययनासाठी ‘टेस्ट’
- आॅनलाईन शंकासमाधान