नागपुरात ऑटोचालकांच्या संपाचा विद्यार्थ्यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 12:08 AM2019-01-09T00:08:15+5:302019-01-09T00:09:49+5:30
केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या देशव्यापी संपाला तीन सीटर ऑटोरिक्षा चालक संयुक्त संघर्ष समितीने समर्थन देत मंगळवारी ऑटोरिक्षा बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. परंतु याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. प्रवासी वाहतुकीवर याचा फारसा प्रभाव पडला नसला तरी ऑटोरिक्षांमधून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला. विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्याची जबाबदारी पालकांवर आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या देशव्यापी संपाला तीन सीटर ऑटोरिक्षा चालक संयुक्त संघर्ष समितीने समर्थन देत मंगळवारी ऑटोरिक्षा बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. परंतु याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. प्रवासी वाहतुकीवर याचा फारसा प्रभाव पडला नसला तरी ऑटोरिक्षांमधून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला. विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्याची जबाबदारी पालकांवर आली होती.
ऑटोरिक्षा चालकांनी या बंदमध्ये ऑटो चालकांसाठी समाज कल्याण बोर्डाची स्थापना करण्याच्या मागणीसह इतरही मागण्या रेटून धरल्या. तीन सीटर ऑटोरिक्षा चालक संयुक्त संघर्ष समितीचे हरिश्चंद्र पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले, संपात ८० टक्के ऑटोचालक सहभागी झाले होते. संविधान चौकात दुपारी झालेल्या जाहीर सभेत सहभागीही झाले होते. शहरातील प्रवासी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. प्रत्यक्षात मात्र, संपामधून इतर ऑटोचालक संघटना दूर राहिल्याने प्रवासी वाहतुकीवर फारसा प्रभाव पडला नाही. काही प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक प्रभावित झाली होती.
पालकांची तारांबळ
विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या ऑटोचालकांनी संपाची माहिती एक दिवसापूर्वीच पालकांना दिली होती. यामुळे काही पालकांनी तात्पुरती उपाययोजना केली होती, परंतु ज्या पालकांनी याकडे दुर्लक्ष केले, त्यांची तारांबळ उडाली. शाळेची वेळ होऊनही ऑटोचालक आला नसल्याने पालकांना विद्यार्थ्यांना शाळेत सोडावे लागले. आज अनेक शाळांसमोर उभ्या राहणाऱ्या ऑटोरिक्षांच्या ठिकाणी पालकांनी गर्दी केली होती.