नागपुरात विद्यार्थीनीसह दोघींचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:56 AM2018-05-13T00:56:22+5:302018-05-13T00:56:31+5:30
नर्सिंग कॉलेजमधील एका विद्यार्थिनीसह दोघींचा विनयभंग झाल्याचे गुन्हे अनुक्रमे सीताबर्डी आणि गिट्टीखदान पोलीस ठाण्यात दाखल झाले. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नर्सिंग कॉलेजमधील एका विद्यार्थिनीसह दोघींचा विनयभंग झाल्याचे गुन्हे अनुक्रमे सीताबर्डी आणि गिट्टीखदान पोलीस ठाण्यात दाखल झाले. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
सीताबर्डीच्या एका नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनी असलेली तरुणी (वय २१) शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास आपल्या वर्गात बसून होती. तेथे आरोपी शम्मूवेल राजाराम काशीपेटा (वय २५, रा. भाईगांव चंद्रपूर) हा आला. त्याने तरुणीचा हात पकडून आरडाओरड करीत तेथे गोंधळ घातला. तरुणीला बाहेर नेऊन सर्वासमक्ष धमकी दिली. आजूबाजूची मंडळी धावली. त्यांनी शम्मूवेलला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. नंतर सीताबर्डी पोलिसांनी विनयभंगाच्या आरोपाखाली त्याला अटक केली.
दुसरी घटना गिट्टीखदानमध्ये घडली. शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास पीडित महिला (वय २५) आपल्या चिमुकलीला शोधण्यासाठी काही अंतरावर राहणाऱ्या नातेवाईकाच्या घराकडे जात होती. तेवढ्यात वस्तीत राहणारा आरोपी रुपेश ज्ञानेश्वर ईरपाते (वय २०) तेथे आला. त्याने नातेवाईकाच्या घरी सोडून देतो, असे म्हणत महिलेला आपल्या अॅक्टीव्हावर बसवले. जगदीशनगर समोरच्या मैदानात असलेल्या खोलीत नेऊन त्याने पीडित महिलेचा हात पकडून तिला बिलगण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरड करीत बाहेर पळ काढला. त्यामुळे आरोपीने तिला हा प्रकार बाहेर सांगितल्यास जीवे मारेन, अशी धमकी दिली. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली.