नागपूरचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल; ११ लाखांवर फेरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:53 AM2019-03-18T11:53:23+5:302019-03-18T11:54:58+5:30
रुग्णहिताला प्राधान्य देऊन सुपर स्पेशालिटी रुग्णालयात बॅँकांच्या धर्तीवर ‘टोकन सिस्टीम’ स्थापन करण्यात आली. यावर ११ लाख रुपये खर्चही करण्यात आले. परंतु चार वर्षे होऊनही ही यंत्रणा कार्यान्वितच झाली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रुग्णहिताला प्राधान्य देऊन सुपर स्पेशालिटी रुग्णालयात बॅँकांच्या धर्तीवर ‘टोकन सिस्टीम’ स्थापन करण्यात आली. यावर ११ लाख रुपये खर्चही करण्यात आले. परंतु चार वर्षे होऊनही ही यंत्रणा कार्यान्वितच झाली नाही. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागात रुग्णांच्या वाढत्या गर्दीमुळे पुन्हा एकदा ही बंद यंत्रणा चर्चेला आली आहे. अतिविशेषोपचार असलेले मध्य भारतातील पहिले हे शासकीय रुग्णालय आहे. यामुळे विदर्भासह आजूबाजूच्या राज्यातून रुग्ण येतात. २०१४ मध्ये या रुग्णालयात ४६ हजार २०९ नव्या रुग्णांनी उपचार घेतले; ती संख्या २०१८ मध्ये १ लाख ५४ हजार २३८ वर गेली. रुग्णांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन यावर
उपाययोजनेसाठी तत्कालीन विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी २०१५ मध्ये रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) रुग्णांच्या सोयीसाठी ‘टोकन सिस्टीम’ प्रणालीचा प्रस्ताव तयार केला होता. यात ओपीडीचे कार्ड काढताना त्यांच्या नावाचा नंबर थेट संबंधित विभागाच्या कक्षासमोर लागलेल्या स्क्रीनवर दिसणार होता. यामुळे रुग्णांना कक्षासमोर गर्दी करण्याची किंवा तासन्तास ताटकळत रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नव्हती. या प्रणालीसाठी आमदार निधीतून ११ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीमधून प्रत्येक कक्षाच्या समोर टोकन नंबर दिसण्यासाठी स्क्रीन लावण्यात आले. काही दिवस प्रायोगिक स्तरावर ही प्रणाली राबविण्यातही आली. परंतु नंतर बंद पडले ते कायमचेच. नंतरच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांनी तो सुरू करण्याचा प्रयत्नही केला नाही. यामुळे ‘ओपीडी’चे नियोजनच ढासळल्याचे चित्र आहे. हृदय शल्यचिकित्सा, (सीव्हीटीएस), हृदयरोग (कार्डिओलॉजी), मेंदूरोग (न्यूरोलॉजी), मज्जातंतूची शल्यक्रिया (न्यूरोसर्जरी), मूत्रपिंड विकार (नेफ्रोलॉजी), मूत्ररोग (यूरोलॉजी), पोटाचे विकार (गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी) व ‘एन्डोक्रेनॉलॉजी’ या विभागांची ओपीडी आठवड्यातून दोनच दिवस असते. यामुळे त्या त्या दिवशी रुग्णांची मोठी गर्दी उसळते. अटेंडंट रुग्णांच्या नावाचा पुकारा करीत रुग्णांना बोलावून घेतो. परंतु अनेकापर्यंत त्याचा आवाज पोहचतच नाही. यामुळे रुग्ण खुर्चीवर न बसता कक्षेसमोर गर्दी करतात. या गर्दीतून मार्ग काढणेही अनेकांना कठीण जाते. काही तर नंबर आला का, हे पाहण्यासाठी थेट डॉक्टरांसमोर गर्दी करतात.
अनेकवेळा त्यांना सुरक्षा रक्षकांचीही मदत घ्यावी लागते. सोयीची यंत्रणा असताना ते बंद ठेवण्यामागील कारण काय, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.