नागपुरात स्वाईन फ्लू, उष्माघाताच्या रुग्णात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:51 PM2019-04-22T22:51:12+5:302019-04-22T22:54:52+5:30
वाढत्या तापमानामुळे स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या रोडावण्याची शक्यता वर्तविली जात असताना, रुग्णांची संख्या ३२८ तर बळीची संख्या २३ वर पोहोचली आहे. दुसरीकडे उष्माघातानेही डोके वर काढले आहे. आतापर्यंत ५० रुग्णांची नोंद झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाढत्या तापमानामुळे स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या रोडावण्याची शक्यता वर्तविली जात असताना, रुग्णांची संख्या ३२८ तर बळीची संख्या २३ वर पोहोचली आहे. दुसरीकडे उष्माघातानेही डोके वर काढले आहे. आतापर्यंत ५० रुग्णांची नोंद झाली आहे.
बदलत्या वातावरणाचा दुष्परिणाम शरीरावर पडतो. यात सर्वात जास्त तापदायक ठरतो तो उन्हाळा. या ऋतुमध्ये उष्माघाताचे सर्वात जास्त रुग्ण आढळून येतात. नागपूर विभागात १५ मार्च ते २१ एप्रिलपर्यंत नागपूर ग्रामीणमध्ये २० तर नागपूर शहरामध्ये ३० रुग्णांची नोंद झाली आहे. यात सुदैवाने मृत्यूची नोंद नाही. उष्माघात वाढत असताना स्वाईन फ्लूच्या रुग्णातही वाढ होताना दिसून येत आहे. २२ एप्रिलपर्यंत विदर्भात या रुग्णांची संख्या ३२८ वर पोहोचली आहे. धक्कादायक म्हणजे, यातही नागपूर शहर व ग्रामीण आघाडीवर आहे. शहरात २१६ रुग्ण व १४ मृत्यू तर ग्रामीणमध्ये २१ रुग्ण दोन मृत्यूची नोंद झाली आहे. एप्रिल महिन्यात आतापर्यंत ४० रुग्ण आढळून आले आहेत. इतर जिल्ह्यांमध्ये वर्धेत पाच रुग्ण, गोंदियात पाच रुग्ण, भंडाऱ्यात चार रुग्ण व एक मृत्यू, गडचिरोलीत तीन, चंद्रपुरात सहा रुग्ण व एक मृत्यू, अमरावतीत २४ रुग्ण व चार मृत्यू, अकोल्यात दोन रुग्ण, यवतमाळ येथे दोन रुग्ण व एका मृत्यूची नोंद आहे. इतर राज्यातून नागपुरात उपचारासाठी आलेल्या अशा मध्य प्रदेशातील ३६ रुग्ण तर पश्चिम बंगालचा एक रुग्ण आहे. सद्यस्थितीत २१ रुग्ण शहरातील विविध खासगी इस्पितळात उपचार घेत आहेत.