नागपुरात शिक्षकाने केली अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडखानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 11:50 PM2018-12-26T23:50:58+5:302018-12-26T23:51:23+5:30
लकडगंज येथील अयाचित मंदिराजवळ एका कोचिंग क्लासच्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडखानी केली. मंगळवारी सकाळी घडलेल्या या घटनेने पालकांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लकडगंज येथील अयाचित मंदिराजवळ एका कोचिंग क्लासच्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडखानी केली. मंगळवारी सकाळी घडलेल्या या घटनेने पालकांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
रामकृष्ण सुरुसे (४५) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. रामकृष्ण याचे अयाचित मंदिराजवळ कोचिंग क्लास आहे. तो दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवतो. परिसरातील प्रतिष्ठित कोचिंग क्लास असल्याने त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिकायला येतात. पीडित १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी अकरावीची विद्यार्थिनी आहे. रामकृष्णने मंगळवारी सकाळी विद्यार्थिच्या कुटुंबीयांना फोन करून ‘तो गावी जात आहे. तेव्हा मुलीच्या हातून शिकवणी शुल्क पाठवण्यास’ सांगितले. त्यामुळे कुटुंबीयांनी ५ हजार रुपये देऊन मुलीला शिकवणी वर्गात पाठवले. सकाळी १० वाजता विद्यार्थिनी कोचिंग क्लासमध्ये पोहोचली. ख्रिसमसची सुटी असल्याने कोचिंग क्लास बंद होता. तिथे रामकृष्णशिवाय कुणीच नव्हे. त्याने विद्यार्थिनीसोबत आपत्तीजनक व्यवहार केला. यामुळे मुलगी घाबरली. ती बाहेर निघून गेली. घरी पोहोचल्यावर तिच्या एकूणच व्यवहारामुळे आईला संशय आला. तिने विचारपूस केली तेव्हा मुलीने घडलेला प्रकार सांगितला. तिच्या घरच्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी छेडखानीचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
रामकृष्ण हा मूळचा आर्वीचा आहे. त्याचे म्हणणे आहे की, विद्यार्थिनी त्याच्या मुलीच्या वयाची आहे. तिला मुलीच्या नात्यानेच लाड केला. परंतु रामकृष्णच्या व्यवहरामुळे पालक अतिशय संतापले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, शिकवणी शुल्क घेण्याच्या बहाण्याने मुलीला कोचिंग क्लासमध्ये बोलावण्याचे कुठलेही औचित्य नव्हते.