मराठा-कुणबी सर्वेक्षणाला शिक्षकांचा नकार

By कमलेश वानखेडे | Published: January 24, 2024 04:00 PM2024-01-24T16:00:59+5:302024-01-24T16:01:46+5:30

सांस्कृतिक कार्यक्रम व परीक्षेत शिक्षक व्यस्त : विद्यार्थ्यांना शाळाबाह्य करुन शिक्षकांना वेठीस का धरता?

nagpur teacher rejection of maratha kunbi survey | मराठा-कुणबी सर्वेक्षणाला शिक्षकांचा नकार

मराठा-कुणबी सर्वेक्षणाला शिक्षकांचा नकार

कमलेश वानखेडे, नागपूर : दहावी बारावीच्या परीक्षा अगदी तोंडावर आल्या असतांना व शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम सुरु असताना मराठा-कुणबी संवर्गातील प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्याचा आदेश सरकारने काढला. त्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षणही सुरु केले आहेत. मात्र सर्वेक्षणाचा हा आदेश तत्काळ मागे घ्यावा अन्यथा बहिष्कार टाकण्याचा इशारा विदर्भ प्राथमिक, माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघाने दिला असून या संबंधीचे निवेदन बुधवारी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दहावी बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा आहेत. सध्या विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा सुरु आहेत. सराव परीक्षेचे मूल्यमापन शिक्षकांना करावयाचे आहे. तसेच परीक्षा अगदी तोंडावर असल्यामुळे शिक्षक आपापल्या अभ्यासक्रमाची उजळणी करीत आहेत. विद्यार्थ्यांसाठीचे जानेवारी फेब्रुवारीच्या अखेरपर्यंतचे दिवस महत्वाचे आहे. अशात जानेवारी महिन्यात शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत मुख्याध्यापक व शिक्षकांना मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. ऐन परीक्षांच्या तोंडावरच व सांस्कृतिक कार्यक्रम सुरु असल्याने शिक्षक वर्गात चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. एकाच वेळी परीक्षेची, सांस्कृतिक कार्यक्रमाची, राष्ट्रीय सणाची तयारी आणि सर्वेक्षण हि दोन्ही कामे सुरु होत असल्याने बहुतांश शिक्षकांनी यास नकार दर्शविला आहे.

शिक्षकांची कमतरता

आधीच शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची कमतरता आहे. अनेक शाळा एक शिक्षकी असून चार चार वर्ग सांभाळत आहेत. त्यातही त्यांच्यामागे निवडणूक, कुठलेसे सर्वेक्षण, शासकीय कार्यक्रम , कुठले तरी प्रशिक्षण अशी अनंत कामाची मालिकाच असते. ते शिक्षक मुलांना शिकवणार कधी, आणि हि सारी कामे करणार कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

विदर्भ मुख्याध्यापक संघाचा बहिष्कार

सर्वेक्षण काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर शिक्षकांचे पूर्णतः दुर्लक्ष होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भरून न काढणारे नुकसान होणार आहे. विदर्भ प्राथमिक, माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ व विदर्भ मुख्याध्यापक संघाने सर्वेक्षणावर बहिष्कार घातला आहे. प्रशासनाने या बाबत तातडीने तोडगा काढावा अशी मागणी शिक्षक नेते मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी शिष्टमंडळात विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष व शिक्षक नेते मिलिंद वानखेडे, विभागीय सचिव खिमेश बढिये, जिल्हा संघटक शेषराव खार्डे, जिल्हा ग्रामीण संघटक गणेश खोब्रागडे, टीईटी जिल्हा संघटक भिमराव शिंदे, पारशिवनी तालुका संघटक नरेश तेलकापल्लीवार, महिला संघटिका पुष्पा बढिये आदी उपस्थित होते.

Web Title: nagpur teacher rejection of maratha kunbi survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.