नागपुरात शिक्षकांनी घरापुढे बसून केले आत्मक्लेश आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 08:18 PM2020-05-26T20:18:47+5:302020-05-26T20:19:53+5:30
गेल्या १० ते १५ वर्षापासून विनावेतन विद्यादानाचे काम करणारे हजारो शिक्षक इतर कामधंदा करून उदरनिर्वाह करीत आहे. कोरोनामुळे तुटपुंजे मिळणारे उत्पन्नसुद्धा बंद झाले आहे. त्यामुळे कुटुंबीयांच्या उपजीविकेचा प्रश्न शिक्षकांपुढे निर्माण झाला आहे. विनावेतन शिक्षकांची उपासमार थांबविण्यासाठी विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर असोसिएशनने एक दिवस अन्नत्याग करून स्वत:च्या घरापुढे आत्मक्लेश आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या १० ते १५ वर्षापासून विनावेतन विद्यादानाचे काम करणारे हजारो शिक्षक इतर कामधंदा करून उदरनिर्वाह करीत आहे. कोरोनामुळे तुटपुंजे मिळणारे उत्पन्नसुद्धा बंद झाले आहे. त्यामुळे कुटुंबीयांच्या उपजीविकेचा प्रश्न शिक्षकांपुढे निर्माण झाला आहे. विनावेतन शिक्षकांची उपासमार थांबविण्यासाठी विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर असोसिएशनने एक दिवस अन्नत्याग करून स्वत:च्या घरापुढे आत्मक्लेश आंदोलन केले. निधी वितरणाचा आदेश तातडीने निर्गमित करण्याची मागणी संघटनेने केली आहे. कोरोनाच्या संकटात शिक्षकांच्या सेवा शासनाने घेतल्या. शिक्षकांना दारूची दुकाने, नाके, सुरक्षा कर्मचारी आदी कामे दिली. मात्र कोणतीही सुरक्षा साधने दिली नाही. आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षकांना विमा स्वरुपात सुरक्षा कवच द्यावे, याकडेही आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधले. त्याचबरोबर घोषित, अघोषित अनुदान वितरणाचा आदेश निर्गमित व्हावा, जुनी पेन्शनसंबंधी समितीचा अहवाल तातडीने सादर व्हावा, वाढीव पदमान्यता व आयटीआयला अनुदान द्यावे, अकरावीचा प्रवेश शाळा व महाविद्यालयस्तरावर करण्याचे अधिकार द्यावे, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे. संघटनेचे महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर यांनी केलेल्या आवाहनानुसार संघटनेचे पदाधिकारी व शिक्षकांनी स्वत:च्या घरापुढे एकदिवसीय आत्मक्लेश आांदोलन केले.