नागपूर पुन्हा ४५ पार, ब्रम्हपुरी-वर्धा ४६ पार
By निशांत वानखेडे | Published: June 1, 2024 07:16 PM2024-06-01T19:16:19+5:302024-06-01T19:18:48+5:30
ढगांनी वाढविला उष्णतेचा त्रास : दशकात पहिल्यांदाच आठवडाभर उष्णतेची लाट
नागपूर : मे संपून जून उजाळला पण सूर्याचे आग ओकणे थांबायला तयार नाही. शनिवारी विदर्भातील बहुतेक शहरात कमाल तापमानाने उसळली घेतली. ब्रम्हपुरी ४६.५ अंश, वर्धा ४६ अंश आणि नागपूरचा पारा ४५.५ अंशावर चढला. दिवसभर ढगाळ वातावरण हाेते, पण या ढगांनी उष्णतेचा त्रास अधिकच वाढविला. हा दमट उकाडा पुढचे दाेन दिवस पुन्हा छळेल, अशी शक्यता आहे.
नवतपा सुरू झाल्यापासून उन्हाच्या तडाख्याने राजस्थान व उत्तर भारतासाेबत विदर्भातील नागरिकांचेही हालबेहाल केले आहेत. गेल्या दशकभरात पहिल्यांदा उष्णतेची लाट आठवडाभर चालली आहे. विदर्भातील शहरांचा पारा ४४ ते ४६ च्या स्तरावर कायम आहे. शनिवारी तापमानात पुन्हा भर पडली. वर्धा, ब्रम्हपुरी व नागपूरशिवाय चंद्रपूर ४५ अंशावर हाेते. दुसरीकडे अमरावती, यवतमाळ, गडचिराेली, गाेंदिया व भंडारा येथे पारा ४४ अंशाच्यावर कायम आहे. विशेष म्हणजे शनिवारी सकाळपासून आकाश ढगांनी व्यापले हाेते. मात्र या ढगांनी गारवा दिला नाही. ढगांमधील बाष्प आणि सूर्यकिरणांच्या संयुगाने उकाड्याची तीव्रता आणखी वाढविली.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भात आणखी दाेन दिवस उष्ण लाटेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने तापमानवाढीचा अलर्टही जारी केला असल्याने नागरिकांना शक्यताे उन्हापासून स्वत:चा बचाव करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वेळेआधी केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सून व त्याच्या परिस्थितीच्या प्रभावाने मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे.
जूनच्या तिसऱ्या आठवड्यात पेरणी शक्य
वेळेआधी केरळमध्ये दाखल झालेला मान्सून येत्या ४ ते ५ दिवसात कर्नाटक किनारपट्टीपर्यंत पोहोचू शकतो. पण त्यानंतर त्याची प्रगती कदाचित धिम्या गतीनेही होवु शकते असे वाटते. पूर्वमोसमी व मान्सूनच्या सरींच्या शक्यतेनुसार महाराष्ट्रात शेतकऱ्यांना खरीप पेर तयारीसाठी शेतमशागती व त्यानंतर पेरणीसाठीच्या आवश्यक जमीन ओलीसाठी जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजे साधारण २० जून दरम्यान पर्यंतही कदाचित वाट पहावी लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले.