नागपुरात तापमान घसरले, थंडी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 12:27 AM2018-11-10T00:27:24+5:302018-11-10T00:28:41+5:30
नागपुरात खऱ्या अर्थाने दसऱ्यापासून थंडीला सुरुवात होते. परंतु यंदा दिवाळी आल्यावरही नागपूरकरांना थंडी जाणवली नाही. गेल्या काही दिवसांत नागपूरचे किमान तापमान २१ डिग्री सेल्सिअसच्या वरच नोंदविल्या गेले. परंतु गुरुवारी अचानक तापमानात ७ अंशाची घट बघायला मिळाली. दिवाळीच्या मध्यरात्री कमाल तापमान घटल्याबरोबरच थंडीही वाढलेली जाणवली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात खऱ्या अर्थाने दसऱ्यापासून थंडीला सुरुवात होते. परंतु यंदा दिवाळी आल्यावरही नागपूरकरांना थंडी जाणवली नाही. गेल्या काही दिवसांत नागपूरचे किमान तापमान २१ डिग्री सेल्सिअसच्या वरच नोंदविल्या गेले. परंतु गुरुवारी अचानक तापमानात ७ अंशाची घट बघायला मिळाली. दिवाळीच्या मध्यरात्री कमाल तापमान घटल्याबरोबरच थंडीही वाढलेली जाणवली.
येणाऱ्या दिवसात हवामान खात्याने तापमानात घट होण्याचे संकेत दिले आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील किमान तापमान २१ डि.से. नोंदविण्यात आले होते. दिवाळीच्या दिवशी ७ नोव्हेंबरला रात्री १२.७ डिग्रीवर तापमान घसरले होते. हवामान खात्याने ८ नोव्हेंबरच्या सकाळी शहरातील कमाल तापमान ३२.३ नोंदविले. तर किमान तापमान १२.७ डि.से. नोंदविले होते. हवामान खात्याने दिलेल्या संकेतानुसार येणाऱ्या दिवसात तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे. १४ नोव्हेंबरपर्यंत नागपूरचे कमाल तापमान १० ते ११ डिग्री सेल्सियसवर येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कमाल तापमानातसुद्धा घट होण्याची शक्यता दर्शविली आहे. शुक्रवारी दुपारी नागपुरात कमाल तापमान ३२ नोंदविल्या गेले. तर किमान तापमानाची नोंद १६ डिग्री सेल्सियस घेण्यात आली.
घरातून निघाले स्वेटर
रात्री आणि सकाळी वातावरणात थंडी जाणवायला लागली आहे. त्यामुळे बाहेर पडणाऱ्यांनी गरम कपड्यांचा आधार घेतल्याचे दिसून आले. थंडीमुळे अनेकांनी आपले स्वेटर काढायला सुरुवात केली आहे. सकाळी मॉर्निंग वॉक करणारे, दुचाकीने बाहेर पडणारे स्वेटर घातलेले दिसून आले.