Nagpur: पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन धावत्या ट्रेनमधून गुन्हेगार पळाला, हावडा दुरंतो एक्सप्रेसमधील घटना
By नरेश डोंगरे | Published: June 3, 2023 10:52 PM2023-06-03T22:52:06+5:302023-06-03T22:52:36+5:30
Crime News: धावत्या ट्रेनमधून पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक गुन्हेगार पळून गेला. शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास १२२२२ हावडा - पुणे दुरंतो एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली.
- नरेश डोंगरे
नागपूर - धावत्या ट्रेनमधून पुणेपोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक गुन्हेगार पळून गेला. शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास १२२२२ हावडा - पुणे दुरंतो एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली. आरोपीचे नाव संजय जाना (वय ३०) असून तो पुणे येथील रहिवासी असल्याचे समजते.
पुणे येथील फरसखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूकीच्या (कलम ४०६, ४२०) गुन्ह्यात आरोपी संजय फरार होता. त्याला पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्याला हावडा-पुणे दुरंतो एक्सप्रेसच्या बी-८ कोचमध्ये बसवून पोलीस पुण्याकडे घेऊन जात होते. नागपूरहून शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास रेल्वेगाडी बुटीबोरीकडे असताना गुमगावजवळ त्याने बाथरुमला जायचे आहे, असे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याला टॉयलेटजवळ नेले. आरोपी संजयने आतून दार बंद केले. बराच वेळ होऊनही तो बाहेर येण्याचे नाव घेत नसल्याने पोलिसांनी टॉयलेटचे दार ठोठावले. आतून प्रतिसाद मिळत नसल्याने पोलिसांना शंका आली. त्यानंतर कसेबसे दार उघडले असता आरोपी टॉयलेटची खिडकीची काच तोडून उडी घेऊन पळून गेल्याचे स्पष्ट झाले. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली.
३६ तासानंतरही छडा नाही
या घटनेला आता जवळपास ३६ तास झाले. मात्र, फरार झालेल्या संजयचा छडा लागला नाही. दरम्यान, ही घटना रेल्वे पोलीस तसेच रेल्वे सुरक्षा दलाला कळविण्यात आली असून बुटीबोरी आणि नागपूर पोलिसांनाही ही माहिती देण्यात आली. तेव्हापासून रेल्वेसह स्थानिक पोलीसही आरोपी संजयचा शोध घेत आहेत. या संबंधाने रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.