Nagpur: मे महिन्याचा शेवटही विजा-वादळी वाऱ्यानेच हाेणार, उकाडा जाणवेल, पण चटके नाही

By निशांत वानखेडे | Published: May 19, 2024 07:52 PM2024-05-19T19:52:52+5:302024-05-19T19:53:32+5:30

Nagpur News: अवकाळीचे सावट संपल्यानंतर सूर्याचा ताप वाढेल, असा हवामान विभागाचा अंदाज हाेता, पण आता पुन्हा परिस्थिती बदलली असून मे महिन्याचा शेवटही विजांची चमक आणि वादळ वाऱ्यानेच हाेणार, अशी शक्यता विभागाने वर्तविली आहे.

Nagpur: The end of May will also be accompanied by thunderstorms, heat will be felt, but not hot. | Nagpur: मे महिन्याचा शेवटही विजा-वादळी वाऱ्यानेच हाेणार, उकाडा जाणवेल, पण चटके नाही

Nagpur: मे महिन्याचा शेवटही विजा-वादळी वाऱ्यानेच हाेणार, उकाडा जाणवेल, पण चटके नाही

- निशांत वानखेडे  
नागपूर - अवकाळीचे सावट संपल्यानंतर सूर्याचा ताप वाढेल, असा हवामान विभागाचा अंदाज हाेता, पण आता पुन्हा परिस्थिती बदलली असून मे महिन्याचा शेवटही विजांची चमक आणि वादळ वाऱ्यानेच हाेणार, अशी शक्यता विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे यापुढे उकाडा जाणवेल पण उन्हाचे चटके मात्र जाणवणार नाही, असेच चित्र दिसून येत आहे.

रविवारी विदर्भात सर्वच जिल्ह्यात कमाल तापमानात अंशत: वाढ झाली. अकाेल्याचा पारा पुन्हा ४३.२ अंशावर गेला. त्याखालाेखाल ४२.२ अंशावर ब्रम्हपुरी आहे. बाकी चंद्रपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ व बुलढाण्यात तापमान ४० अंशाच्या आसपास हाेते. मात्र नागपूर, गाेंदिया, गडचिराेलीत पारा ३८.६, ३८.४ व ३६.६ अंशावर आहे.
हवामान खात्याने उन्हाची काहीली वाढण्याचा अंदाज व्यक्त केला हाेता. मात्र सध्या परिस्थिती विपरित हाेत आहे. मध्य महाराष्ट्र व आसपास सायक्लाेनिक सर्क्युलेशन तयार झाले आहे व मध्य प्रदेशपर्यंत झंझावात निर्माण झाला आहे. अंदमानपर्यंत पाेहचलेला मान्सून प्रगतीपथावर आहे. त्यामुळे विदर्भात वादळी स्थिती निर्माण झाली आहे.

वेधशाळेच्या वेबसाईटवर दर्शविलेल्या स्थितीनुसार विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गाेंदिया, अमरावती जिल्ह्यात २० मे चा एक दिवस साेडून, तर अकाेला, यवतमाळ, बुलढाणा व वाशिम येथे पुढचा पूर्ण आठवडा वादळ वारा, विजांच्या कडकडाटासह जाणार आहे. याची चाहुल रविवारीही दिसून आली. दिवसभर आकाशात उन-सावल्यांचा खेळ चालला हाेता. सायंकाळी हलक्या वाऱ्यासह वादळी स्थिती तयार झाली हाेती. तापमान वाढले पण चटक्यांऐवजी उकाडा अधिक जाणवत हाेता. वेधशाळेने पुढच्या २५ मे पर्यंत वादळासह तुरळक ठिकाणी किरकाेळ पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यापुढे मान्सून पूर्व परिस्थिती सक्रिय हाेण्याची शक्यता असल्याने मे महिनाही कमी तापाचा ठरणार, असा अंदाज आहे.

प्री-मान्सूनची स्थिती शेवटच्या आठवड्यात
दरम्यान रविवारी अंदमानमध्ये धडकलेला मान्सून वेगाने पुढे सरकत आहे. मे च्या शेवटी ताे केरळमध्ये व त्यानंतर देशात प्रवेश करण्याचा अंदाज आहे आणि जूनच्या दुसऱ्या आठवड्यात ताे महाराष्ट्रात दाखल हाेईल. त्यामुळे मे च्या शेवटच्या आठवड्यातच मान्सून पूर्व पावसाला सुरुवात हाेईल, अशीही शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Nagpur: The end of May will also be accompanied by thunderstorms, heat will be felt, but not hot.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.