नागपुरकरांचे 'लाख-लखते' पुणेरी प्रेम; महिनाभरात पुणे गाठणारांची संख्या एक लाखावर!
By नरेश डोंगरे | Published: September 26, 2024 11:35 PM2024-09-26T23:35:33+5:302024-09-26T23:36:06+5:30
छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्यांचीही संख्या लक्षणीय : खासगी बस रोजच हाऊसफूल्ल
- नरेश डोंगरे
नागपूर : देशभरातील नागरिकांचे मायानगरी मुंबईवरील प्रेम सर्वश्रूत आहे. सक्रीनवर चमकण्यासाठी, रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी आणि अशाच दुसऱ्या कोणत्या कारणाने देशातील कानाकोपऱ्यातून रोज मोठ्या प्रमाणावर नागरिक मुंबईत दाखल होतात. नागपूरकर मंडळी मात्र मुंबईसोबतच पुण्यावरही लाखमोलाचे प्रेम करतात. होय, महिनाभरात एक लाखावर नागपूरकर पुणे गाठतात. खासगी बस प्रवाशांच्या संख्येतून हे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मात्र, पुण्याला राज्याची सांस्कृतिक राजधानी मानली जाते. एज्युकेशन हब आणि रोजगाराच्या मोठ्या संधी असल्याने ठिकठिकाणची मंडळी पुण्यात स्थिरावली आहे. नागपूर-विदर्भातील मोठ्या संख्येत विद्यार्थी पुण्याला शिकायला अन् नोकरीच्या निमित्ताने राहतात. त्यानिमित्ताने त्यांचे तात्पुरते वास्तव्य असले तरी या मंडळीपैकी अनेक जण रोज आपल्या गाव, घर अन् नातेवाईकाला भेटण्यासाठी नागपूर-विदर्भात जात येत असतात. त्यात ट्रॅव्हल्सने येणारा-जाणारांची संख्या मोठी आहे.
खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या नागपुरात एकूण ३०० ट्रॅव्हल्स आहेत. त्या महाराष्ट्रातील जवळपास बहुतांश मोठ्या शहरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड तसेच आंध्र प्रदेशमधील विविध शहरात प्रवाशांची ने-आण करतात. यातील सर्वाधिक ९० बसेस पुण्यासाठी धावतात आणि ३६ सिटर असलेली प्रत्येक बस अपवाद वगळता रोजच पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांनी खच्चून भरलेली असते.
अर्थात रोजचा हिशेब केल्यास नागपुरातून खासगी बसने पुण्याला रोज ३२४० प्रवासी जातात. महिन्याची प्रवाशांची ती संख्या ९७ हजारांवर जाते. सणोत्सवाच्या दिवसांचा विचार केल्यास हा आकडा लाखांवर जातो. या आकडेवारीतून नागपूरकरांचे लखलखते पुणेरी प्रेम अधोरेखित होते. पुण्याचे नियमित ट्रॅव्हल्सचे तिकिट १२०० ते १५०० दरम्यान असते. तर, उन्हाळ्यात आणि सणोत्सवाच्या दिवसांत ते २००० च्या घरात जाते.
छत्रपती संभाजीनगरालाही जाणारांची संख्या मोठी
नागपुरातून खासगी बसने छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या प्रवाशांचीही संख्या मोठी आहे. संभाजीनगरसाठी नागपूरहून रोज २५ बसेस सुटतात. बसमधील ३६ पैकी ३० सिट जवळपास रोजच पॅक असतात. अर्थात महिन्याला २२ ते २५ हजार प्रवासी संभाजीनगरला जातात.
नाशिक, मुंबई, इंदोर अन् हैदराबाद बसमध्येही गर्दी
मुंबईला रोज १० बसेस जातात आणि नागपूरहून रोज मायानगरीत जाणारांची संख्या ३०० ते ४०० च्या घरात आहे. नाशिक १५ बसेस आणि प्रवाशांची संख्या ४०० ते ५००, हैदराबाद रोज ६५ बसेस आणि प्रवाशी संख्या १९०० ते २०००, इंदोर १५ बसेस आणि प्रवाशी संख्या ४०० ते ५०० एवढी आहे.
प्रवाशांना आरामदायक प्रवासाची अनुभूती देण्याचा आमचा प्रयत्न असतो. पुण्याला जाणाऱ्या एका बसला सुमारे ४ हजार टोल टॅक्स द्यावा लागतो. याशिवायही अन्य खर्च असतात. वर्षाला सरासरी १५ कोटींचा टॅक्स आम्ही सरकारच्या तिजोरीत जमा करतो.
- बाबासाहेब डवरे
अध्यक्ष, शहर बस ओनर्स असोसिएशन, नागपूर.