नागपूर : होस्टेलमध्येच सुरू असलेले नर्सिंग कॉलेज आता बंद होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 07:05 PM2023-08-28T19:05:35+5:302023-08-28T19:05:45+5:30
मेडिकल नर्सिंग कॉलेजच्या इमारतीसाठी ५० कोटी मंजूर
नागपूर : आशिया खंडातील दुसºया क्रमांकाचे सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या मेडिकलच्या नर्सिंग कॉलेजला स्वत:ची इमारतच नाही. आजही याचे कॉलेजचे वर्ग होस्टेलमध्येच भरतात. तब्बल ५० वर्षानंतर या इमारतीसाठी आता विशेष प्रयत्न झाल्याने सरकारने बांधकामासाठी ५० कोटींना मंजुरी दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाºया जम्मू-काश्मीरमधील शीतल राजकुमार या विद्यार्थिनीचा ५ जुलै रोजी एका आजाराने अचानक मृत्यू झाला. या मृत्यूला कारणीभूत असलेल्या होस्टेलमधील समस्या ठळकपणे पुढे आल्या. कॉलेजला स्वत:ची इमारतच नसल्याची आणि नर्सिंगचे वर्ग चक्क होस्टेलमध्ये भरत असल्याची बाबही समोर आली. विशेष म्हणजे, १९५८ मध्ये मेडिकलचा बांधकामाचा नकाशात नर्सिंग कॉलेजची स्वतंत्र इमारत मंजूर होती.
कॉलेजची इमारत बांधण्यापूर्वी नर्सिंग होस्टेलचे बांधकाम झाले. त्यानंतर होस्टेलसमोरील मोकळ्या भूखंडावर नर्सिंगची स्वतंत्र इमारत तयार होणार होती. परंतु नंतर कोणीच पुढाकार घेतला नाही. अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी पदभार सांभाळल्यानंतर नर्सिंग कॉलेजच्या बांधकामला गंभीरतेने घेतले होते. त्यांचे प्रयत्न सुरू असतानाच जुलै महिन्यात एका विद्यार्थिनीच्या अचानक मृत्यूने नर्सिंग कॉलेजमधील गैरसोयींचा पाढाच वाचण्यात आला. परिणामी, सरकारनेही याची दखल घेत कॉलेजच्या बांधकामासाठी ५० कोटी ६५ लाख ७१ हजार ८५३ रुपयांचा निधीला प्रशासकीय मान्यता दिली.
होस्टेलमध्ये बीएस.सी. नर्सिंगचे वर्ग
२००६ पासून बीएस.सी नर्सिंग सुरू झाले. या नव्या अभ्यासक्रमाचे वर्गही याच होस्टेलमध्ये सुरू झाले. विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोयही वसतिगृहात होत असल्याने विद्यार्थ्यांसोबतच येथील शिक्षकांसाठी गैरसोयीचे होत होते. उशीरा का होईना आता कॉलेजची स्वतंत्र इमारत होणार असल्याने मोठा दिलासा मिळाला.
७७ कोटींचा होता प्रस्ताव
नर्सिंग कॉलेजचा इमारतीचा ७७ कोटींचा प्रस्ताव होता, परंतु मान्यात ५० कोटी ६५ लाख रुपयांनाच मिळाली. यामुळे इमारत तीन मजलीची राहणार असलीतरी काही वर्ग खोल्या कमी होण्याची शक्यता आहे.
नर्सिंग कॉलेजचा प्रगतीसाठी प्रयत्न
मेडिकल नर्सिंग कॉलेजला स्वतंत्र इमारत असावी यााठी सुरुवातीपासून प्रयत्न सुरू होते. अखेर त्याला यश मिळाले. बांधकामासाठी ५० कोटी ६५ लाख रुपयांना प्रशासकीय मंजुरी मिळाली. मेडिकल कॉलेजचा अमृत महोत्सव होऊ घातला असताना नर्सिंग कॉलेजची इमारत होणे हा मोठा दिलासा आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल, त्यांना अधिक दर्जेदार शिक्षण देण्यासही मदत होईल.
-डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता मेडिकल