वर्धेच्या स्ट्रॉबेरीला 'रिचिंग टू अनरीच्ड'चे बळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे अभियान
By आनंद डेकाटे | Published: May 20, 2024 09:47 PM2024-05-20T21:47:18+5:302024-05-20T21:51:15+5:30
Nagpur News: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्ताने राबविल्या जात असलेल्या 'रिचिंग टू अनरीच्ड' अभियानाचे बळ वर्धा जिल्ह्यातून महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या स्ट्रॉबेरी उत्पादन व प्रक्रिया उद्योगाला मिळणार आहे.
- आनंद डेकाटे
नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्ताने राबविल्या जात असलेल्या 'रिचिंग टू अनरीच्ड' अभियानाचे बळ वर्धा जिल्ह्यातून महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या स्ट्रॉबेरी उत्पादन व प्रक्रिया उद्योगाला मिळणार आहे. स्ट्रॉबेरी उत्पादन व प्रक्रिया उद्योगासह स्थानिक नैसर्गिक संसाधनांचा वापर करून शाश्वत विकासाचा मार्ग शोधण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात वर्धेचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांची सकारात्मक चर्चा झाली.
भंडारा, गोंदिया नंतर आता वर्धा जिल्ह्यात स्थानिक कृषी उत्पादनापासून प्रक्रिया उद्योग निर्मितीला बळ देत नाविन्यपूर्ण पद्धतीने सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने पाऊल उचलले आहे. वर्धा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून स्थानिक स्तरावर उपलब्ध असलेल्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करून रोजगार निर्मिती व्हावी या दृष्टीने विद्यापीठाकडून कौशल्य विकासावर भर दिला जात आहे. कौशल्य प्रशिक्षणानंतर रोजगार/उद्योग स्थापण्याकरिता आवश्यक सहायता आणि सुविधा या अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहे. वर्धा जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक संसाधनांचा वापर करून विविध प्रकल्प 'रिचिंग टू अनरीच्ड' अभियान राबविणबाबत ही बैठक घेण्यात आली.
बैठकीला विद्यापीठाचे आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता व प्रकल्प अधिकारी डॉ. प्रशांत कडू, जिल्हा समन्वयक डॉ. संजय कवीश्वर, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजूरवार, डॉ. सुरेश रैना, संचालक डॉ. सुरेश मसराम, बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. गिरीश ठाकरे, यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र बेले उपस्थित होते.
स्ट्रॉबेरी प्रकल्पासह वॉटर कप गटांची मदत
जिल्ह्यात नव्यानेच घेतल्या जात असलेल्या स्ट्रॉबेरीचे नविन्यपूर्ण वितरण आणि प्रक्रिया उद्योग कसा निर्माण करता येईल यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. सोबतच पाणी फाउंडेशनच्या 'फार्मर्स कप' स्पर्धेसाठी तयार असलेल्या जिल्ह्यातील अंदाजे २ हजार गटांसोबत मिळून अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे आर्वी उपसा सिंचन प्रकल्प निर्मितीत स्थानिक विद्यार्थ्यांचा कौशल्य वाढीच्या दृष्टीने सहभाग कसा करून घेता येईल, याबाबत चर्चा करण्यात आली.