Nagpur: एटीएममध्ये ॲल्युमिनियम प्लेट फसवून करणाऱ्या चोरट्याला अटक, सीसीटीव्हीमुळे लागला पोलिसांच्या हाती
By योगेश पांडे | Published: June 2, 2024 03:28 PM2024-06-02T15:28:50+5:302024-06-02T15:29:12+5:30
Nagpur News: एटीएममध्ये ॲल्युमिनियम प्लेट फसवून येणारी रक्कम अगोदर अडकवून व त्यानंतर ग्राहक परतल्यावर ती रक्कम लांबविणाऱ्या चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. बुलेटवर जात हा आरोपी शहरातील एटीएम टार्गेट करायचा.
- योगेश पांडे
नागपूर - एटीएममध्ये ॲल्युमिनियम प्लेट फसवून येणारी रक्कम अगोदर अडकवून व त्यानंतर ग्राहक परतल्यावर ती रक्कम लांबविणाऱ्या चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. बुलेटवर जात हा आरोपी शहरातील एटीएम टार्गेट करायचा. त्याने असा पद्धतीने आठहून अधिक एटीएममध्ये चोरी केल्याची बाब प्राथमिक चौकशीतून समोर आली असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चारच्या पथकाने ही कारवाई केली.
कडबी चौक येथे बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम असून तेथे १ जून रोजी सकाळी एसएनजी ९०९० या आयडी क्रमांकाच्या मशीनमधील माऊथ शटर ॲसेम्ब्लीमध्ये छेडछाड झाल्याची बाब समोर आली. त्या एटीएममधून हजार रुपये काढण्यात आले होते. असाच प्रकार त्याच एटीएममध्ये २८ मे व ३० मे रोजीदेखील झाला होता. यावरून बॅंकेचे अधिकारी स्वप्निल मारोतराव गभने यांनी जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चारचे पथक समांतर तपास करत असताना सीसीटीव्ही व खबऱ्यांच्या माध्यमातून यात मयुर कायरकर हा सहभागी असल्याची माहिती मिळाली. तो एमएच ४९ सीई ७०७२ या क्रमांकाच्या बुलेटने मानेवाडा परिसरात फिरत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने जरीपटक्यात आणखी दोन, पाचपावलीत तीन व नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी एटीएममध्ये अशा पद्धतीने चोरी केल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यातून २.३० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक रमेश ताले, अविनाश जायभाये, सुनिल ठवकर, अतुल चाटे, आशीष क्षीरसागर, चेतन पाटील, देवेंद्र नवघरे, स्वप्नील अमृतकर, संदीप मावलकर, श्रीकांत मारवाडे, लिलाधर भेंडारकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अशी करायचा आरोपी चोरी
आरोपी ॲल्युमिनियमची पट्टी एटीएम मशीनमध्ये फसवायचा. जेथून पैसे बाहेर येतात तेथेच ती पट्टी फसवून तो एटीएम बाहेर जाऊन उभा रहायचा. ग्राहकाने पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यावर ते पट्टीमुळे फसले रहायचे. त्यामुळे ग्राहक मशीनमध्ये पैसेच नाही असे समजून निघून जायचे. त्यानंतर मयुर आतमध्ये जाऊन पट्टी काढायचा व ती रोख रक्कम ओढून बाहेर काढायचा. त्याने अशा पद्धतीने अगोदर किती एटीएममध्ये चोरी केली आहे याची चौकशी सुरू आहे.