नागपुरात चोरट्या महिलांचा धुमाकूळ सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:04 PM2019-04-15T23:04:56+5:302019-04-15T23:05:39+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमात झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्या महिलांनी कार्यक्रमस्थळी आलेल्या सहा महिलांचे दागिने चोरून नेले. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाराखोली चौकात रविवारी रात्री ८ ते ९ या वेळेत ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमात झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्या महिलांनी कार्यक्रमस्थळी आलेल्या सहा महिलांचे दागिने चोरून नेले. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाराखोली चौकात रविवारी रात्री ८ ते ९ या वेळेत ही घटना घडली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने इंदोऱ्यातील बाराखोली चौकात असलेल्या डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ जयंती दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येत बाबासाहेबांचे अनुयायी जमले होते. तेथे झालेल्या गर्दीत काही चोरट्या महिला शिरल्या. त्यांनी गीता दुर्वेंद्र लोखंडे (वय ३५, रा. मोठा इंदोरा, श्रावस्तीनगर), फ्लोरी सनी जॉन डग्लस (वय ४८, रा. मार्टिननगर), वंदना संजय राऊत (वय ५२, रा. मोठा इंदोरा), अनसूया प्रकाश पाटील (वय ४५, रा. भीम चौक, मोठा इंदोरा), शांताबाई हरिभाऊ साखरे (वय ६५, रा. मोठा इंदोरा) आणि निर्मला मिलिंद टेमरे (वय ५०, रा. अशोकनगर) या सहा महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केले. कार्यक्रम सुरू असताना हळूहळू उपरोक्त महिलांच्या लक्षात दागिने चोरीला गेल्याचा प्रकार आला. त्यामुळे त्यांनी जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. चोरट्या महिलांचा शोध घेतला जात आहे.
विशेष म्हणजे, अशाच प्रकारे १३ एप्रिलच्या रात्री अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामनगरात रामनवमीच्या शोभायात्रेत झालेल्या गर्दीत शिरून चोरट्या महिलांनी चार महिलांचे दागिने लंपास केले होते.