Nagpur: कळमना पोलीस चौकीत जुगार खेळणारे ‘ते’ दोन पोलीस निलंबित, वर्षभरापूर्वीचा व्हिडीओ असल्याचे उघड
By दयानंद पाईकराव | Published: August 19, 2024 04:26 PM2024-08-19T16:26:48+5:302024-08-19T16:27:08+5:30
Nagpur Police News: जुना कामठी रोडवरील कळमना पोलीस चौकीत जुगार खेळणाऱ्या दोन पोलीस अंमलदारांना झोन ५ चे पोलीस उपायुक्त अनिकेत कदम यांनी सोमवारी तडकाफडकी निलंबित केले.
- दयानंद पाईकराव
नागपूर - जुना कामठी रोडवरील कळमना पोलीस चौकीत जुगार खेळणाऱ्या दोन पोलीस अंमलदारांना झोन ५ चे पोलीस उपायुक्त अनिकेत कदम यांनी सोमवारी तडकाफडकी निलंबित केले. दरम्यान जुगार खेळताना दोन निलंबीत पोलिसांव्यतिरिक्त आणखी किती पोलीस होते ? याचा शोध घेण्यासाठी या प्रकरणाची चौकशी कामठी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त विशाल क्षीरसागर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
मनोज घाडगे आणि भुषण शाहु साकडे अशी निलंबीत करण्यात आलेल्या पोलीस अंमलदारांची नावे आहेत. कळमना पोलीस ठाण्यात दोन पोलीस अंमलदार वर्दी घालून जुगार खेळत असल्याचा व सिगारेट पित असल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यामुळे नागपूर शहर पोलीस विभागात खळबळ उडाली. परंतु हा व्हिडीओ कळमना पोलीस ठाण्यातील नसून तो जुना कामठी मार्गावरील कळमना पोलीस चौकीतील असल्याचे उघड झाले आहे. झोन ५ चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी या पोलीस चौकीला भेट देऊन पाहणी केली. ही पोलीस चौकी एक सिंगल रूम आहे. तेथे तक्रार देण्यासाठी कोणीही जात नाही. व्हिडीओत जुगार खेळताना घाडगे आणि भुषण शाहु साकडे यांच्या सोबत आणखी काही जणांचे आवाज ऐकु येत असल्यामुळे यात आणखी काही पोलीस सहभागी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी या प्रकरणाचा तपास कामठी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त विशाल क्षीरसागर यांच्याकडे सोपविला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने जुगार खेळणाऱ्या दोन अंमलदारांना निलंबीत केल्यामुळे शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
व्हिडीओ वर्षभरापूर्वीचा
व्हिडीओत जुगार खेळताना दिसत असलेले बीट मार्शल घाडगे आणि भुषण शाहु साकडे हे वर्षभरापूर्वी बीट मार्शल होते. त्यामुळे हा व्हिडीओ वर्षभरापूर्वीचा असल्याचे उघड झाले आहे. दोघेही अंमलदार जुगार कळमना पोलीस चौकीत खेळत होते. या चौकीत कोणीही तक्रार करण्यासाठी जात नाही. त्यामुळे हा व्हिडीओ पोलीस विभागातील कोणीतरी बनविला असून वर्षभरानंतर तो व्हायरल केल्याचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. शिवाय जुगार खेळताना दिसत असलेल्या अंमलदारांच्या चेहऱ्यातही बदल झाल्याचे दिसत असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
दोघांचेही निलंबन, सखोल चौकशी होणार
‘पोलिसांचा गणवेश घालून पोलीस चौकीत जुगार खेळणे हा गुन्हा आहे. त्यामुळे संबंधीतांविरुद्ध तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जुगार खेळताना आणखी पोलीस होते काय याची सखोल चौकशी करण्यासाठी सहायक पोलीस आयुक्त विशाल क्षीरसागर यांच्याकडे चौकशी सोपविण्यात आली आहे.’
- निकेतन कदम
(पोलीस उपायुक्त, परिमंडळ ५, नागपूर शहर)
गैरवर्तन करताना आढळल्यास कडक कारवाई
गणवेश घालून जुगार खेळणे हा गुन्हा असून असे गैरवर्तन करणाऱ्या पोलिसांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. याबाबत कळमना ठाण्यातील सर्व पोलिसांना गंभीरपणे ताकिद देण्यात आली आहे.’
- गोकुळ महाजन |
(वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळमना पोलीस स्टेशन)