Nagpur: 'जैश'कडून रक्तपाताची धमकी, रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणां हाय-अलर्ट: खबरदारीच्या विविध उपाययोजना
By नरेश डोंगरे | Published: October 4, 2024 08:51 PM2024-10-04T20:51:48+5:302024-10-04T20:54:09+5:30
Nagpur Railway News: आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना 'जैश ए मोहम्मद'ने रेल्वे स्थानकांवर बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, नागपूर, महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांसह अन्य राज्यातील रेल्वे स्थानकांनाही सुरक्षेचा वेढा घालण्यात आला आहे.
- नरेश डोंगरे
नागपूर - आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना 'जैश ए मोहम्मद'ने रेल्वे स्थानकांवर बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, नागपूर, महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांसह अन्य राज्यातील रेल्वे स्थानकांनाही सुरक्षेचा वेढा घालण्यात आला आहे. रेल्वेशी संबंधित सर्वच सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या असून बॉम्ब शोधक आणि नाशक पथकासह रेल्वे स्थानकाच्या कानाकोपऱ्यावर नजर रोखण्यात आली आहे.
विविध राज्यातील ८ मोठ्या रेल्वे स्थानकांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने दिली आहे. सुरक्षा यंत्रणांना तसे ईनपूट मिळताच गंभीर दखल घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, देशभरातील रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. विविध प्रांतातील रेल्वे सुरक्षा यंत्रणांमधील शिर्षस्थांनी आपसात समन्वय करीत आपापल्या कार्यक्षेत्रातील रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना अतिसतर्कतेचे आदेश दिले आहे.
विशेष म्हणजे, सध्या सुरू असलेल्या नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त ठिकठिकाणच्या शक्ती पीठांमध्ये, माता मंदीरात दर्शन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक जात-येत आहेत. त्यामुळे रेल्वेेगाड्यांमध्ये तसेच रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी आहे. त्यात विचाराचे सोने लुटण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येत बाबासाहेबांचे अनुयायी दसऱ्याला नागपूरच्या दीक्षाभूमीवर येतात. त्यामुळे येथील रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी असते. ही पार्श्वभूमी आणि जैशकडून मिळालेली धमकी बघता सुरक्षा यंत्रणा हायअलर्ट झाल्या आहेत. गर्दीचा लाभ ऊठवत कुण्या समाजकंटकाने संधी साधू नये म्हणून नागपूर रेल्वे स्थानकावरही सुरक्षेच्या खास उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
धमकीच्या वृत्ताला दुजोरा
सूत्रांच्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मदचा येरिया कमांडर मोहम्मद सलीम अंसारी याने ही धमकी दिली आहे. या संबंधाने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे संपर्क केला असता घातपाताच्या इनपूटबाबतची माहिती त्यांच्याकडून मिळाली नाही. मात्र, धमकी मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले असून सुरक्षेच्या उपाययोजनांचीही माहिती दिली आहे.
सर्व सुरक्षा यंत्रणांचा समन्वय : सुरक्षा आयुक्त
कुण्या एका रेल्वे स्थानकाला धमकी मिळाली हे सांगणे योग्य होणार नाही. मात्र, धमकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व सुरक्षा यंत्रणां समन्वयाने काम करीत आहोत. आरपीएफ, जीआरपी आणि रेल्वे प्रशासनाला अतिसतर्कतेचे आदेश देण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी २४ तास सजगपणे काम केले जात असल्याची माहिती आरपीएफचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यानी लोकमतशी बोलताना सांगितले.
बीडीडीएस सज्ज, स्कॅनरवरही खास नजर : रेल्वे पोलीस अधीक्षक
रेल्वे स्थानकावर अतिरिक्त बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून रेल्वे स्थानकाच्या संपूर्ण परिसरावर सूक्ष्म नजर रोखण्यात आली आहे. आरपीएफच्या मदतीने पेट्रोलिंग वाढविण्यात आली आहे. बॅग स्कॅनरवर खास लक्ष ठेवले जात असून, संशयास्पद वाटणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जात आहे. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून, श्वानांकडून कुठे काही संशयास्पद आहे का, त्याची आम्ही खातरजमा करून घेत आहोत, अशी माहिती रेल्वेचे पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी दिली.