नागपुरात सायबर गुन्हेगाराची खंडणीसाठी धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 03:46 PM2018-04-13T15:46:05+5:302018-04-13T15:46:16+5:30
लंडनहून पार्सल आले आहे, असे सांगून नागालॅण्डमधील एका आरोपीने सिखा आनंद (वय ३४ रा. तेलीपुरा, गणेशपेठ) नामक महिलेला १ लाख, १९ हजारांचा गंडा घालण्याचा प्रयत्न केला. रक्कम दिली नाही तर तुझ्या मुलीला जिवंत मारू, अशी धमकीही आरोपीने दिली. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लंडनहून पार्सल आले आहे, असे सांगून नागालॅण्डमधील एका आरोपीने सिखा आनंद (वय ३४ रा. तेलीपुरा, गणेशपेठ) नामक महिलेला १ लाख, १९ हजारांचा गंडा घालण्याचा प्रयत्न केला. रक्कम दिली नाही तर तुझ्या मुलीला जिवंत मारू, अशी धमकीही आरोपीने दिली. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला.
फिर्यादी महिला शिक्षिका आहेत. १० मार्चला दुपारी ४ वाजता त्यांच्या मोबाईलवर फोन आला. आपण तोविका अड्डमी बोलतो, असे सांगत आरोपीने सिखा यांना तुमचे लंडनहून पार्सल आले आहे. ते सोडविण्यासाठी तुम्हाला पैसे भरावे लागतील, असे म्हटले. सिखा यांनी आरोपीला कुठून बोलता असे विचारले असता नागालँडमधून बोलतो, असे सांगितले. १ लाख, २० हजार रुपये भरले नाही तर तुम्हाला खोट्या गुन्ह्यात फसवू आणि तुमच्या मुलीला जिवंत मारू, अशी धमकीही आरोपीने दिली. त्यामुळे सिखा घाबरल्या. त्यांनी लगेच आरोपीने सांगितलेल्या बँक खात्यात १ लाख, १९ हजार रुपये जमा केले.
पैसे वाचले, आरोपीची शोधाशोध
पैसे जमा केल्यानंतर त्यांनी हा प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला. नातेवाईकांनी त्यांना पोलिसांकडे नेले. पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने आरोपीचे बँक खाते फ्रीज केले. त्यामुळे सिखा यांची रक्कम वाचली. प्राथमिक चौकशीत आरोपी दिल्ली येथील असावा, असा संशय अधोरेखित झाला आहे. गणेशपेठचे पीएसआय एस. पी. इंगळे यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.