नागपुरात पोलीस शिपायासह तिघांनी लावला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 12:00 AM2020-08-25T00:00:09+5:302020-08-25T00:01:18+5:30
आजारपणाला कंटाळलेल्या एका पोलीस शिपायाने गळफास लावून आत्महत्या केली. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी १.३० च्या दरम्यान ही घटना घडली. त्याचप्रमाणे कळमना आणि पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आजारपणाला कंटाळलेल्या एका पोलीस शिपायाने गळफास लावून आत्महत्या केली. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी १.३० च्या दरम्यान ही घटना घडली. त्याचप्रमाणे कळमना आणि पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली.
महेश कॉलनी चंदननगर येथे राहणारे पोलीस शिपाई सुनील शेषराव भोयर (वय ५३) हे अनेक महिन्यापासून आजारी होते. त्यांची नियुक्ती पोलीस मुख्यालयात होती. आजारपणामुळे ते कर्तव्यावरही जाऊ शकत नव्हते. १४ ऑगस्टला अंघोळीला जाताना गरम पाणी अंगावर पडल्याने ते होरपळले. त्यामुळे त्यांच्या वेदना आणखीच वाढल्या. वारंवार उपचार करूनही आजारपणाला फायदा होत नसल्यामुळे ते वैतागले होते. या अवस्थेत त्यांनी सोमवारी दुपारी १.३० च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. विशेष म्हणजे, यावेळी पत्नी आणि मुलगा घरीच वरच्या माळ्यावर होते. मुलाला त्याचे मित्र भेटायला आले तेव्हा खालच्या माळ्यावर त्यांना भोयर गळफास लावून दिसले. त्यामुळे ही घटना उघडकीस आली. त्यांचा मुलगा सुमित सुनील भोयर याने पोलिसांना ही माहिती कळविली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
गळफास लावून आत्महत्या करण्याची दुसरी घटना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ९ ते १० च्या दरम्यान घडली. सागर हरिश्चंद्र डेहुनिया (वय २५) यांनी गळफास लावून घेतला. घरच्यांनी त्यांना डॉक्टरला दाखविले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नंदा हरिश्चंद्र डेहुनिया (वय ४५) यांनी दिलेल्या माहितीवरून कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे. त्याचप्रमाणे पाचपावलीच्या वैशालीनगरात राहणारे संजय मारोतराव कैकाडे (वय ३५) यांनी गळफास लावून घेतला. सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. राजीव मारोतराव कैकाडे यांनी दिलेल्या माहितीवरून पाचपावली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.