नागपुरात ‘आपली बस’च्या तिकिटाचे पैसे कंडक्टरच्या खिशात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:01 AM2018-03-21T00:01:16+5:302018-03-21T00:01:26+5:30
‘आपली बस’ शहर बसचा स्मार्टकार्ड घोटाळा गाजत असतानाच मंगळवारी परिवहन समिती सभापतींनी केलेल्या तपासणी दौऱ्यात प्रवाशांना तिकीट न देता कंडक्टर तिकिटाची रक्कम जमा करून आपल्या खिशात घालत असल्याचा गैरव्यवहार उघडकीस आला. यातील दोषी दोन कंडक्टरला निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले़
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘आपली बस’ शहर बसचा स्मार्टकार्ड घोटाळा गाजत असतानाच मंगळवारी परिवहन समिती सभापतींनी केलेल्या तपासणी दौऱ्यात प्रवाशांना तिकीट न देता कंडक्टर तिकिटाची रक्कम जमा करून आपल्या खिशात घालत असल्याचा गैरव्यवहार उघडकीस आला. यातील दोषी दोन कंडक्टरला निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले़
शहर बसमध्ये तिकिटांचा गैरव्यवहार होत असून बसचे चालक व कंडक्टर बसस्थानकावरून बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना त्याचवेळी तिकीट देत नसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी सकाळी परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, निरीक्षक सुनील शुक्ला व अतुल आकरे, गिरीश महाजन व सुरेश सोयाम आदींनी विविध १० मार्गावरील शहर बसची तपासणी केली. पारडी नाल्याजवळ एमएच ३१-सी२-६१८१ या भिलगाव ते पारडी बसची तपासणी केली असता, या बसमध्ये २६ प्रवासी होते. यातील एकाच प्रवाशाकडे तिकीट होते. तसेच एका मिडीबसची तपासणी केली असता, बसमधील १५ प्रवाशांपैकी २ प्रवाशांकडे तिकीट असल्याचे निदर्शनास आले. या दोन्ही बसच्या कंडक्टर पंकज घोरपडे व आशिष दांडेकर यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश बंटी कुकडे यांनी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तरोडी ते भांडेवाडी, रेल्वेस्टेशन ते पारडी, एचबी टाऊन ते वर्धमानगर, अयाचित मंदिर-महाल ते नरसिंग टॉकीज अशा मार्गावरील बसेसची तपासणी करण्यात आली.
प्रवाशांना वेळेवर तिकीट दिले जाते की नाही. बसचालक बसथांब्यावरून परवानगीनेच बस सोडतात की नाही, यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी डीआयएसएमटीएस(डिम्ट्स) आॅपरेटरची आहे. परंतु आॅपरेटरकडून कोणत्याही स्वरूपाची कारवाई केली जात नाही.
बसमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज आणि २० फेब्रुवारी २०१८ ते २० मार्च २०१८ या एक महिन्याच्या कालावधीचा प्रत्येक बसचा अहवालही सादर करण्यास डिम्ट्सला निर्देश दिले आहे़
दरम्यान, शहर बससेवा चालविण्यासाठी तीन आॅपरेटर नियुक्त करण्यात आले आहेत़ शहरातील स्टार बस या तिन्ही आॅपरेटरला विभागून देण्यात असून ग्रीन बस स्कॅनिया कंपनी चालवीत आहे़ शहरात सध्या ३७० बसेस धावत आहेत़ सर्व बसचे व्यवस्थापन व नियंत्रणाची जबाबदारी डिम्ट्स या आॅपरेटरकडे सोपविण्यात आली आहे़ ही कंपनी कामात हयगय करीत असल्याचा आरोप होत आहे़