नागपूर निर्बंधमुक्त होणार; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2022 09:55 PM2022-02-16T21:55:36+5:302022-02-16T21:56:19+5:30
नागपूर जिल्हाही लवकरच निर्बंधमुक्त होणार असल्याचे संकेत जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिले आहेत. यासंदर्भात एक-दोन दिवसात निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूर : नागपूर जिल्हाही लवकरच निर्बंधमुक्त होणार असल्याचे संकेत जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिले आहेत. यासंदर्भात एक-दोन दिवसात निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नियमानुसार ज्या शहरांमध्ये दोन्ही लसी घेणाऱ्यांचे प्रमाण ७० टक्क्यांच्या खाली आहे, त्या शहरांमध्ये निर्बंधांमध्ये सूट नाही. नागपूरचा विचार केला, जिल्ह्यात दोन्ही लसी घेणाऱ्यांचे प्रमाण ७० टक्क्यांवर पोहोचले आहे. इतकेच नव्हे, तर कोरोना रुग्णांची संख्याही घटली आहे. जिल्हा प्रशासनानेसुद्धा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वास विभागाचे सचिव यांना नागपुरातील निर्बंध हटविण्याबाबत प्रस्तावही पाठविला आहे, परंतु त्यावर निर्णय झालेला नव्हता. परंतु आता यासंदर्भात सकारात्मक निर्णय झाल्याचे सांगितले जाते. जिल्हाधिकारी आर. विमला यांनीसुद्धा तसे संकेत दिले असून नागपूर लवकरच निर्बंधमूक्त होईल, असे सांगितले. याबाबत आज-उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे.