नागपुरात शौचालय कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 11:23 PM2018-05-03T23:23:14+5:302018-05-03T23:55:22+5:30
सुलभ शौचालयात दारू पिण्यास मनाई केली म्हणून तेथील कर्मचाऱ्याची दोन आरोपींनी निर्घृण हत्या केली. राजेश ऊर्फ रज्जू रामनारायण यादव (वय ३८) असे मृताचे नाव आहे. वर्दळीच्या रामनगर चौकाजवळ गुरुवारी भरदुपारी ही थरारक घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुलभ शौचालयात दारू पिण्यास मनाई केली म्हणून तेथील कर्मचाऱ्याची दोन आरोपींनी निर्घृण हत्या केली. राजेश ऊर्फ रज्जू रामनारायण यादव (वय ३८) असे मृताचे नाव आहे. वर्दळीच्या रामनगर चौकाजवळ गुरुवारी भरदुपारी ही थरारक घटना घडली. रितू केसावड (२२) आणि मुनीम तिवारी (२८), अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपी रितू आणि मुनीम हे दोघे दारूडे असून, ते या भागात गुंडगिरीही करतात. ते नेहमीच शौचायलात येऊन साथीदारांसह दारू प्यायचे. वारंवार येथे येऊन दारू पीत असल्याने यादवने त्यांना तेथे येण्यास मनाई केली होती. त्यामुळे आरोपी हे यादवला धडा शिकविण्याच्या तयारीत होते. नेहमीप्रमाणे गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास आरोपी रितू, मुनीम त्यांच्या तीन-चार साथीदारांसह दारूची बाटली घेऊन शौचालयाजवळ आले. ते पाहून यादवने त्यांना तेथे दारू पिण्यास मनाई केली. परिणामी रितू आणि मुनीमने त्याला शिवीगाळ केली. काही वेळेनंतर आरोपी रितू आणि मुनीमने यादवला खेचतच मुनीमच्या भावाच्या उसाच्या रसाच्या हातठेल्याजवळ आणले. ते पाहून त्यांचे साथीदार पळून गेले. यादवला शिवीगाळ करीत बरफ बारीक करण्याचा लाकडी दंडा आणि सत्तूरचे फटके यादवच्या डोक्यावर हाणले. तो बाजूच्या खुर्चीवर पडताच आरोपी पळून गेले. मोठ्या रक्तस्रावामुळे यादवचा जागीच मृत्यू झाला. भरदिवसा अनेकांसमोर ही घटना घडली. त्यामुळे परिसरात थरार निर्माण झाला.
मध्यप्रदेशात पळून जाण्याची तयारी
या हत्याकांडाची माहिती कळताच पोलीस उपायुक्त राकेश ओला, अंबाझरीचे ठाणेदार भीमराव खंदाळे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी आरोपीची शोधाशोध सुरू केली. आरोपी रेल्वेने मध्यप्रदेशात नातेवाईकांकडे पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे कळताच अंबाझरीचे पोलीस पथक रेल्वेस्थानकाकडे धावले. तिकीट काढून रेल्वेगाडीत बसण्याच्या तयारीत असलेले आरोपी रितू आणि मुनीमला पोलिसांनी अटक केली.
मृताचा परिवार उघड्यावर
मृत राजेश हा आधी गुन्हेगारीत सक्रीय होता. त्याला पत्नी भाग्यश्री तसेच यश, वंश आणि अन्य एक मुलगा आहे. राजेशच्या मृत्युमुळे त्याचा परिवार उघड्यावर आला आहे. राजेशचा भाऊ कमलेशच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.