शौचालय स्पर्धेत विदर्भातून नागपूर अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 11:09 PM2019-02-04T23:09:37+5:302019-02-04T23:11:33+5:30
केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने स्वच्छ व सुंदर शौचालय स्पर्धेचे आयोजन केले होते. ३१ जानेवारी ही या स्पर्धेची अंतिम तारीख होती. स्पर्धेमध्ये नागपूर जिल्ह्यातील १ लाख ७० हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यामुळे नागपूर जिल्हा विदर्भातून अव्वल ठरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने स्वच्छ व सुंदर शौचालय स्पर्धेचे आयोजन केले होते. ३१ जानेवारी ही या स्पर्धेची अंतिम तारीख होती. स्पर्धेमध्ये नागपूर जिल्ह्यातील १ लाख ७० हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यामुळे नागपूर जिल्हा विदर्भातून अव्वल ठरला आहे.
आपले शौचालय स्वच्छ सुंदर दिसावे व शौचालयाप्रती अभिमानास्पद स्वामित्व भावना वाटावी आणि स्वच्छता सुविधा स्पष्टपणे नजरेत याव्यात यासाठी देशपातळीवर ग्रामीण भागात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील ७७६ ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धा घेण्यात आली. स्पर्र्धेत प्रत्येक कुटुंबाने स्वनिधीतून शौचालयांची रंगरंगोटी करणे, त्यावर स्वच्छतेचे संदेश लिहणे गरजेचे होते. ही स्पर्धा ग्रामीण भागात स्वच्छतेची जनजागृती करण्यासोबतच त्याचा नियमित वापर करण्यासाठी प्रेरणा देणारी होती. या स्पर्धेत उत्कृष्ट शौचालयांची निवड करून सुमारे चार हजार पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील सुमारे ३४ जिल्ह्यांतून नागपूर जिल्हा हा पाचव्या क्रमांकावर राहिला. तर ४.१९ लाख शौचालयांची रंगरंगोटी करून कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रक्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर सातारा, तिसºया क्रमांकावर जळगाव, चौथ्या क्रमांकावर सोलापूर व पाचव्या क्रमांकावर नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे.
या स्पर्धेतून राज्यातील उत्कृष्ट तीन जिल्हे निवडले जातील. त्यांनतर संबंधित तिन्ही जिल्ह्यातील पाच उत्कृष्ट रंगविलेल्या शौचालयांची निवड केली जाणार आहे. या अभियानात उत्कृष्ट काम केलेल्या राज्यांचे, जिल्ह्यांचे व कुटुंबांची निवड राष्ट्रीय स्तरावर पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने गठित केलेल्या समितीकडून होणार आहे. प्रत्येक ग्रा.पं.मधील पाच उत्कृष्ट रंगविलेल्या शौचालयांची निवड होऊन त्यांना बक्षीस व प्रमाणपत्रे दिली जाणार आहे. त्याच प्रमाणे, जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर या स्पर्धेत उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन ग्रामपंचायतींची निवड होऊन त्यांना बक्षीस व प्रमाणपत्र दिली जाणार आहे. तर जिल्हास्तरावर या स्पर्धेत उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन तालुक्यांनासुध्दा बक्षीस व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
जिल्हानिहाय रंगविलेले शौचालय
जिल्हा स्पर्धक
नागपूर १,७०,३६४
भंडारा २७,३३०
वाशिम ९५७७
वर्धा ६२०३
अमरावती ४७१४
चंद्रपूर २९७४
बुलडाणा २१५९
यवतमाळ २०९३
गोंदिया १५०८
अकोला १४७७
गडचिरोली ३३४