बालगुन्हेगारीच्या प्रकरणांमध्येही नागपूर राज्यात अव्वल; एनसीआरबीचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2022 01:47 PM2022-08-31T13:47:17+5:302022-08-31T13:48:53+5:30

देशात दिल्ली टाॅपवर

Nagpur tops in the state in cases of juvenile delinquency; NCRB report | बालगुन्हेगारीच्या प्रकरणांमध्येही नागपूर राज्यात अव्वल; एनसीआरबीचा अहवाल

बालगुन्हेगारीच्या प्रकरणांमध्येही नागपूर राज्यात अव्वल; एनसीआरबीचा अहवाल

Next

विराज देशपांडे

नागपूर : राष्ट्रीय गुन्हे रेकाॅर्ड ब्युराे (एनसीआरबी)ने नुकत्याच जाहीर केलेल्या २०२१ च्या अहवालानुसार बालगुन्हेगारीच्या प्रकरणांमध्येसुद्धा नागपूर शहर राज्यात अव्वल आणि देशात पाचव्या क्रमांकावर आहे. या आकड्यांमुळे एवढ्या माेठ्या प्रमाणात अल्पवयीन बालके हत्या आणि इतर गंभीर गुन्ह्यांत अडकलेली असणे, हा गंभीर विषय ठरला आहे.

२०२१ मध्ये नागपुरात बालगुन्हेगारीची ३५१ प्रकरणे समाेर आली. त्याखालाेखाल मुंबई (३३२) आणि पुण्यात २८८ प्रकरणांची नाेंद झाली. संपूर्ण देशात २६१८ प्रकरणांसह दिल्ली सर्वाधिक बालगुन्हेगारीग्रस्त असून, त्याखाली चेन्नई (४९६), अहमदाबाद (३८६) आणि सुरत (३५५) चा क्रमांक लागताे.

याबाबत विचारले असताे पाेलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, एनसीआरबीने जारी केलेल्या नेमक्या आकड्यांबद्दल कल्पना नाही; परंतु नागपुरात अल्पवयीन मुलांची प्रकरणे जास्त आहेत हे वास्तव आहे. विशेषतः कोविड -१९ काळात दिसून आले जेव्हा शाळा-महाविद्यालये बंद व ऑनलाइन वर्ग सुरू होते. आकडेवारीवरून नागपुरात १४ खून प्रकरणे नोंदवली गेली, ज्यात अल्पवयीन मुलांचा समावेश होता, जी मुंबईपेक्षा व पुण्यातील (२२) पेक्षा कमी आहेत.

बालकल्याण समिती (सीडब्ल्यूसी) च्या माजी सदस्य ॲड. अंजली साळवे-विटणकर म्हणाल्या, मुलांना सामाजिक मूल्यांचे शिक्षण देण्यात आणि त्यांना जीवन कौशल्ये प्रदान करण्यात शाळेचे महत्त्वाचे स्थान आहे. वंचित वर्गातील कुटुंबांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीच्या उन्नतीसाठी सरकारने कार्यक्रम राबवायला हवेत. उच्चभ्रू कुटुंबातील मुलेही गुन्ह्यांमध्ये अडकत असल्याचे दिसून येत आहे. पालकांनी याकडे बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्यांच्या मुलांवर आणि त्यांना योग्य आणि चुकीची जाणीव करून द्या, असे आवाहन त्यांनी केले.

दुखापतींच्या घटनांमध्ये, नागपूर ६९ प्रकरणांसह राज्यात अव्वल आहे, त्यानंतर मुंबई (५५) आणि पुणे (५३) यांचा क्रमांक आहे. नागपुरात अल्पवयीन मुलांवर बलात्काराची १६ प्रकरणे नोंदवली गेली जी मुंबई (१८) पेक्षा किंचित कमी; परंतु पुण्यापेक्षा (११) जास्त आहेत. चाेरी आणि घरफाेडीमध्ये बालगुन्हेगारांच्या १५७ प्रकरणांसह नागपूर टाॅपर आहे. त्यानंतर मुंबई ९१ व पुण्यात ४७ गुन्ह्यांची नाेंद आहे.

अमितेश कुमार यांनी सांगितले की, विभागाने गेल्या आठ महिन्यांपासून ‘पोलीस दीदी’ आणि ‘पोलीस काका’ कार्यक्रम सुरू केले असून, विकृत अल्पवयीन मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे मूळ उद्दिष्ट आहे. याअंतर्गत अल्पवयीन मुलांचे, तसेच त्यांच्या पालकांचे समुपदेशन केले जाते. शहरातील काही हॉटस्पॉटस् आहेत ज्यांना ओळखले गेले आहेत जेथे बालगुन्हेगारांचे वास्तव्य जास्त आहे आणि या प्रवृत्तीला मागे टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आयुक्त म्हणाले.

शहर - २०१९ - २०२० - २०२१

नागपूर - ३६९ - २७४ - ३५१

मुंबई - ६११ - ३३२ - ३३२

पुणे - २९९ - २४३ - २८८

Web Title: Nagpur tops in the state in cases of juvenile delinquency; NCRB report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.