स्मार्ट सिटीच्या रँकिंगमध्ये नागपूर अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 08:07 PM2019-02-07T20:07:42+5:302019-02-07T20:14:02+5:30
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कामे सुरू असलेल्या देशभरातील १०० शहरांचे रँकिंग केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयातर्फे केले जाते. यात गेल्या सहा महिन्यापासून नागपूर शहर पहिल्या क्रमांकावर आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विकास कामांना गती मिळाल्याने नागपूरने अव्वल स्थान कायम ठेवले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कामे सुरू असलेल्या देशभरातील १०० शहरांचे रँकिंग केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयातर्फे केले जाते. यात गेल्या सहा महिन्यापासून नागपूर शहर पहिल्या क्रमांकावर आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विकास कामांना गती मिळाल्याने नागपूरने अव्वल स्थान कायम ठेवले आहे.
मार्च २०१८ मध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली. ३५८८.९७ कोटींचा हा प्रकल्प आहे. यात नागपूर सेफ अॅन्ड स्मार्ट सिटी प्रोजेक्ट, प्रोजेक्ट टेंडरशुअर व प्रोजेक्ट होम-स्वीट-होम या प्रमुख प्रकल्पांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग, नागपूर पोलीस आयुक्तालय व स्मार्ट अॅन्ड सस्टेनबल सिटी डेव्हलमेंट कॉर्पाेरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सेफ अॅन्ड स्मार्ट सिटी प्रोजेक्ट राबविला जात आहे. ५२०कोटींचा आहे. या प्रकल्पामुळे गुन्ह्याचा शोध व उकल होण्याला मदत होत आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी मदत, सीटी ऑपरेशन सेंटरमुळे नागरी सुविधा जलद गतीने पुरविण्याला मदत होत आहे. गतिमान, पारदर्शी व लोकाभिमुख प्रशासनाची संकल्पना प्रत्यक्षात येण्याला मदत होत आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून यासाठी एक हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पांची कामे गतीने सुरू असल्याची माहिती स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांनी दिली.
सेफ अॅन्ड स्मार्ट सिटी प्रोजेक्ट
५२० कोटींच्या या प्रकल्पात १०४५ किलोमीटर लांबीचे रस्ते, पोलीस आयुक्तालय व महापालिका क्षेत्रात ७०६ जंक्शनवर ३६७४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. १४०वायफाय, ५३ व्हेरीएबल मेसेज साईनबोर्ड, १० इन्व्हायरमेन्टल सेन्सर, ५६ ठिकाणी पब्लिक अलाऊ न्समेंट यंत्रणा, ५ मोबाईल सर्व्हेलन्स व्हॅन आणि ५ ड्रोन, २०स्मार्ट बिन्स, ६५ सिटी किऑक्स, ३८३ स्मार्ट लाईट्स, स्मार्ट पार्किंग, स्मार्ट ट्रान्सपोर्ट, मनपात सिटी ऑपरेशन सेंटर, पोलीस विभागासाठी कमांड अॅन्ड कंट्रोल सेंटर आदींचा समावेश आहे. यातील बहुसंख्य प्रकल्पांची कामे अंतिम टप्प्यात आहेत.
प्रोजेक्ट टेंडरशुअर
प्रोजेक्ट टेंडरशुअर प्रकल्प पूर्व नागपुरातील भरतवाडा, पारडी, पुनापूर या भागातील १७३० एकर परिसरात उभारला जात आहे. ६५० कोटींचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते नुकतेच भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पामुळे १ लाख १३ हजार लोकांना फायदा होणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा एकात्मिक पद्धतीने मिळतील. रोजगारांच्या संधी निर्माण होतील. परिसरात २४ बाय ७ पाणीपुरवठा व परिसरात कार्यक्षम घनकचरा व्यवस्थापन होणार आहे. ५२ किलोमीरचे रस्ते, २९ पुलांचे निर्माण, ७ हजार एलईडी पथदिवे, मल: निस्सारण आदींचा समावेश आहे.
होम-स्वीट-होम प्रोजेक्ट
होम-स्वीट-होम प्रोजेक्ट २२२.०९ कोटींचे आहे. यात एक हजार प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, उत्कृष्ट दर्जाच्या सोयीसुविधा, उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात येणार आहे. भरतवाडा, पारडी, पुनापूर या भागात प्रकल्पग्रस्तांसाठी १०२४ सदनिकांचे बांधकाम केले जाणार आहे. एकसंध काँक्रिट बिल्डिंग, सौरऊर्जा, पावसाच्या पाण्याची साठवण, हरित इमारतीची संकल्पा, मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र, व्यावसायिक दुकाने, गार्डन, जॉगींग, पार्किंग आदींचा समावेश आहे.
चांगल्या कामाचे फलित
स्मार्ट सिटी प्रकल्पाला गती मिळाली आहे. सेफ अॅन्ड स्मार्ट सिटी प्रोजेक्टचे काम अंतिम टप्प्यात आहे. प्रोजेक्ट टेंडरशुअर व होम-स्वीट-होम प्रोजेक्टच्या कामाला सुरुवात झाली आहे. परिणाम गेल्या सहा महिन्यापासून नागपूर रँकिंगमध्ये अव्वल आहे.
अभिजित बांगर, आयुक्त महापालिका
रँकिंगमध्ये क्रमानुसार अव्वल दहा शहरे
शहर प्राप्त गुण
नागपूर ३६०.२१
भोपाळ ३२९.३२
रांची २७२.०२
अहमदाबाद २६५.३७
सूरत २२६.३७
बडोदा २२३.५८
विशाखापट्टणम २१९.५६
पुणे २१०.६७
झाशी १८१.७४
धवनगिरी १७२.२६