नागपुरातील व्यापारी नाराज, आज बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 11:49 PM2020-08-24T23:49:06+5:302020-08-24T23:50:12+5:30
शहरातील व्यापारी शासन व प्रशासनाशी असंतुष्ट आहेत. मंगळवारी २५ ऑगस्ट रोजी कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मंडी सेसच्या विरोधात बंद राहील. चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अॅण्ड ट्रेड(कॅमिट)च्या बॅनरअंतर्गत निदर्शने केली जातील.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील व्यापारी शासन व प्रशासनाशी असंतुष्ट आहेत. मंगळवारी २५ ऑगस्ट रोजी कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मंडी सेसच्या विरोधात बंद राहील. चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अॅण्ड ट्रेड(कॅमिट)च्या बॅनरअंतर्गत निदर्शने केली जातील. या बंदला नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सनेही आपले समर्थन दिले आहे. मनपा आयुक्तांच्या फेसबुक लाईव्हमध्ये व्यापाऱ्यांविरुद्ध करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे एनव्हीसीसी नाराज आहे. दुसरीकडे शहरातील सराफा व्यापाऱ्यांनीही १० दिवसासाठी आपले प्रतिष्ठान सोमवारपासून बंद केले आहेत. हे ऐच्छिक आहे. परंतु जवळपास ३,००० सराफा दुकानांपैकी तब्बल २,५०० दुकाने आज पहिल्याच दिवशी बंद होती.
सराफा संघटनेचे म्हणणे आहे की, कोविड-१९ च्या वाढते संक्रमणामुळे व्यापाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे आवाहन करण्यात आले आहे. परंतु खासगीत बोलताना मात्र काही सराफा व्यापाऱ्यांनी ऑड-इव्हन फॉर्म्युला आणि प्रशासनाच्या कठोर भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. एकूणच मंगळवारी शहरातील बहुतांश दुकानांवर टाळे दिसून येतील. औषधांची दुकाने मात्र सुरू राहतील. नागपूर इतवारी किराणा मर्चंट असोसिएशनसुद्धा या बंदमध्ये सहभागी नाही.
राज्य सरकार ठोस निर्णय घेत नाही
चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अॅण्ड ट्रेड(कॅमिट)चे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने एपीएमसी यार्डच्या बाहेर विकण्यात आलेल्या कृषी वस्तूंना मंडी सेसमधून सूट देण्यासाठी कृषी सुधार अध्यादेश जारी केला आहे. कॅमिट अनेक वर्षांपासून एपीएमसी सेसला समाप्त करण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी करीत आहे. परंतु राज्य सरकार कुठलाही ठोस निर्णय घेत नाही, त्यामुळे एपीएमसी बंद ठेवण्यात येईल. त्यांनी सांगितले की, एनव्हीसीसीसह दि होलसेल ग्रेन अॅण्ड सीड मर्चंट असोसिएशन, कांदा-बटाटा बाजार आडतिया वेलफेयर असोसिएशन, कळमना धान्यगंज आडतिया, युवा आडतिया सब्जी असोसिएशन, कळमना होलसेल मिरची मार्केट असोसिएशन, कळमना फू्रट मार्केट असोसिएशन यांनीही या एक दिवसीय बंदला समर्थन दिले आहे.
नागपूर आमचेच प्रवासी अधिकाऱ्यांचे नव्हे
नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स(एनव्हीसीसी)ने मनपा आयुक्तांच्या फेसबुक लाईव्हमध्ये ‘हे शहर तुमच्यामुळे नव्हे तर तुम्ही शहरामुळे आहात’या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. एनव्हीसीसीने प्रसिद्धीपत्रक जारी करीत म्हटले आहे की, हे सर्वांनाच माहीत आहे की, नागपूर आमची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. आम्ही आमची निष्ठा व कर्तव्याने शहराला बनविले आहे. या शहरानेच आम्हाला जगवले. आमची कर्मभूमी आमच्यामुळे नाही तर प्रवासी अधिकाऱ्यांच्या पुरुषार्थाने चालत आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला. एनव्हीसीसीने असेही म्हटले आहे की, आयुक्त स्वत:ला न्यायप्रणालीच्याही वर मानतात. व्यापार लायसेन्सचा आदेश एमएमसी अॅक्टच्या तरतुदींवर कसा खरा उतरतो, याची माहिती त्यांनी दिली नाही. राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांनी व्यापाऱ्यांवर केला. ते सरकारच्या आदेशाविरुद्ध खासगी प्रयोगशाळेत व्यापारी आणि दुकानातील कर्मचाऱ्यांची कोविड टेस्ट करण्यावर जोर देत आहेत. आयुक्त स्वत: दुटप्पी वागत आहेत. आयुक्तांची कार्यशैली द्वेषपूर्ण आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री आणि महापौर यांनी यावर अंकुश लावावा आणि त्यांचे आदेश रद्द करावे, अन्यथा असहयोग आंदोलन करावे लागेल, असा इशाराही दिला आहे.