नागपुरात मेट्रोच्या टिप्परने युवा व्यापाऱ्यास चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 10:34 PM2019-03-04T22:34:32+5:302019-03-04T22:35:05+5:30

मेट्रोच्या टिप्परने बाईकस्वार युवा व्यापाऱ्यास चिरडले. हा अपघात रविवारी मध्यरात्री कामठी रोडवरील गड्डीगोदाम चौकाजवळ घडला. आशिष रवींद्र जाचक (३७) रा. साई नाईक हाऊसिंग सोसायटी, झिंगाबाई टाकळी असे मृताचे नाव आहे.

Nagpur train crash kills young businessman in Nagpur | नागपुरात मेट्रोच्या टिप्परने युवा व्यापाऱ्यास चिरडले

नागपुरात मेट्रोच्या टिप्परने युवा व्यापाऱ्यास चिरडले

googlenewsNext
ठळक मुद्देकामठी रोडवरील घटना : आरोपी चालक फरार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेट्रोच्या टिप्परने बाईकस्वार युवा व्यापाऱ्यास चिरडले. हा अपघात रविवारी मध्यरात्री कामठी रोडवरील गड्डीगोदाम चौकाजवळ घडला. आशिष रवींद्र जाचक (३७) रा. साई नाईक हाऊसिंग सोसायटी, झिंगाबाई टाकळी असे मृताचे नाव आहे.
आशिष प्रिंटिंग प्रेसचे काम करीत होते. सीताबर्डी येथे त्यांचे महाराष्ट्र इंटरप्रायजेस नावाचे कार्यालय आहे. आशिष रात्री १२ वाजता कार्यालयातून काम आटोपून बाईकने घरी जात होते. गड्डीगोदाम चौकातून कडबी चौकच्या दिशेने जाताना कामठी रोड गुरुद्वाराजवळ अज्ञात टिप्परने आशिषला चिरडले. टिप्परचे चाक पोटावरून गेल्याने आशिषचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर टिप्पर चालक फरार झाला. रस्त्याने जात असलेल्या लोकांनी सदर पोलिसांना सूचना दिली. पीएसआय विनोद मात्र घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आशिषला मेयो रुग्णालयात नेले, तिथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सदर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात टिप्पर मेट्रोचा असल्याची माहिती आहे.
आशिषच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. कुटुंबात आई-वडील, पत्नी तेजस्विनी, मुले ऋग्वेद (७) आणि विराट (३) व विवाहित बहीण आहे. वडील रवींद्र जाचक कोषागारातील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. पत्नी गृहिणी आहे. आशिषच्या खांद्यावरच कुटुंबाचा भार होता. आशिष अतिशय मेहनती आणि चांगल्या स्वभावाचे होते. स्वत:च्या मेहनतीने त्यांनी व्यवसाय वाढवला होता. व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी कर्जही घेतले होते. ते चुकविण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करीत होते. त्यामुळेच रविवार असूनही रात्री १२ वाजेपर्यंत ते कार्यालयात काम करीत होते. जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष अजय ढोमणे यांनी सांगितले की, आशिष प्रिंटिंग प्रेससह शिक्षण संस्थांनाही विविध साहित्य उपलब्ध करून देत होते.
सीसीटीव्ही फुटेज तपासताहेत पोलीस
सदर पोलीस टिप्परचा पत्ता लावण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करीत आहेत. रात्रीची वेळ असल्याने टिप्परचा नंबर दिसून येत नाही आहे. टिप्पर पिवळ्या रंगाचा आहे. पोलिसांनी मेट्रोशी संबंधित एका टिप्पर चालकाची विचारपूसही केली आहे. मंगळवारी इतर टिप्पर चालकांचीही विचारपूस केली जाईल.

Web Title: Nagpur train crash kills young businessman in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.