Nagpur: धुक्यामुळे गाड्या लेट; ‘फॉग सेफ्टी डिव्हाइस’चा फायदा काय? रेल्वेचा दावा, किती खरा, किती खोटा
By नरेश डोंगरे | Published: January 15, 2024 10:43 PM2024-01-15T22:43:30+5:302024-01-15T22:43:59+5:30
Indian Railway: ‘फॉग सेफ्टी डिव्हाइस’मुळे सिग्नल दृश्यमानता कमी असतानाही लोको पायलटला दाट धुक्यात स्पष्ट दिसेल. त्यामुळे रेल्वेगाड्यांच्या गतीला ब्रेक बसणार नाही अन् प्रवाशांचा खोळंबा होणार नाही, असा दावा तीन आठवड्यांपूर्वी मध्य रेल्वे प्रशासनाने केला होता.
- नरेश डोंगरे
नागपूर - ‘फॉग सेफ्टी डिव्हाइस’मुळे सिग्नल दृश्यमानता कमी असतानाही लोको पायलटला दाट धुक्यात स्पष्ट दिसेल. त्यामुळे रेल्वेगाड्यांच्या गतीला ब्रेक बसणार नाही अन् प्रवाशांचा खोळंबा होणार नाही, असा दावा तीन आठवड्यांपूर्वी मध्य रेल्वे प्रशासनाने केला होता. मात्र, धुक्यामुळे अनेक रेल्वेगाड्या उशिरा धावत असल्याने या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सध्या उत्तर भारतात शितलहर आल्याने उत्तर भारतातून देशाच्या विविध भागांत धावणाऱ्या रेल्वेगाड्यांवर त्याचा प्रतिकुल परिणाम झाला आहे. भारताचा मध्यबिंदू असलेल्या नागपुरातून देशाच्या चारही बाजूला रेल्वेगाड्या येतात आणि जातात. अर्थात उत्तर भारताच्या शितलहरीचा आणि धुक्यामुळे प्रभावित झालेल्या रेल्वेगाड्याच्या संचलनाचा परिणाम नागपूरमार्गे धावणाऱ्या रेल्वेगाड्यांवरही झाला आहे. गेल्या एका आठवड्यापासून धुक्यामुळे रेल्वेगाड्या उशिरा धावत आहेत. आज सोमवारी देखिल २६ गाड्या उशिरा धावत असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांकडून पुढे आली आहे आणि त्याचमुळे मध्य रेल्वेने कार्यान्वित केलेल्या ‘फॉग सेफ्टी डिव्हाइस सिस्टम’वरही प्रश्नचिन्ह लागले आहे.
कारण मध्य रेल्वे प्रशासनाने २४ डिसेंबर २०२३ ला जारी केलेल्या माहितीनुसार मुंबई, नागपूर, पुणे, भुसावळ आणि सोलापूर या पाच विभागाला '५०० फॉग सेफ्टी डिव्हाईस' दिलेत. जीपीएस तंत्रज्ञानावर संचालित होणाऱ्या या उपकरण-सिस्टीममुळे रेल्वे इंजिनच्या चालकांना कमी दृश्यमानतेतही चांगले दिसेल. परिणामी धुक्यामुळे ट्रेनची गती जी साधारणत: ३० ते ६० किलोमिटर प्रतितास मंदावते, ती मंदावणार नाही आणि प्रवासी गाड्यांचा खोळंबा होणार नाही, असे सांगण्यात आले होते. मात्र, फॉग सेफ्टी डिव्हाईस कार्यान्वित असतानाही मोठ्या प्रमाणात रेल्वेगाड्या विलंबाने धावत असल्याने रेल्वे अधिकाऱ्यांचा दावा किती खरा किती खोटा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गाड्या लेट, दाव्यातील 'फॉग' बाहेर !
रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिनाभरात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाला १२० फॉग सेफ्टी डिव्हाईस, नागपूर विभाग १२०, पुणे विभाग ८०, भुसावळ विभाग १०० उपकरणे आणि सोलापूर विभागाला ८० डिव्हाईस देण्यात आले तरीसुद्धा गाड्या उशिरा धावण्याचे प्रकार सुरूच असल्याने रेल्वे अधिकाऱ्यांच्या दाव्यातील 'फॉग' बाहेर आला आहे. या संबंधाने विचारणा केली असता त्यांनी गाड्या उशिरा धावत असल्याचे मान्य केले. मात्र, सर्वच गाड्या धुक्यामुळे लेट नसल्याची पुस्तीही रेल्वे अधिकाऱ्यांनी जोडली आहे.