नागपूर वाहतूक पोलिसांतर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 10:21 AM2019-06-04T10:21:41+5:302019-06-04T10:22:49+5:30
वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून मुस्लीम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. यात मुस्लीम बांधवांसह पोलीस आयुक्तही सहभागी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून मुस्लीम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. यात मुस्लीम बांधवांसह पोलीस आयुक्तही सहभागी झाले.
रमजान ईद पुढ्यात असून मुस्लीम बांधवांचे रोजे सध्या सुरू आहे. शहर पोलीस दलात कार्यरत मुस्लीम बांधव तसेच वाहन चालकांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्याची कल्पना वाहतूक शाखेकडून पुढे आली. त्यानुसार सोमवारी सायंकाळी सिव्हिल लाईनमधील वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त कार्यालय परिसरात इफ्तार पाटीचे आयोजन करण्यात आले. यात पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, अतिरिक्त आयुक्त बी. जी. गायकर, अतिरिक्त आयुक्त महावरकर, अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, वाहतूक शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने, मौलाना सादिर शेख, अल्ताफ अन्सारी, ऑटो संघटनेचे पदाधिकारी तसेच पोलीस दलातील मुस्लीमबांधव मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. यावेळी पोलीस आयुक्तांसह अन्य मान्यवरांनी या आयोजनाची प्रशंसा करून मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. रोजा ठेवणाऱ्या मुस्लीम बांधवांनी या कार्यक्रमातच गोडधोड पदार्थ घेऊन रोजा सोडला. कार्यक्रमाचे संचालन आणि आभारप्रदर्शन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेश भंडारकर यांनी केले.