Nagpur: शरबत अन लाेणचे बनविण्यासाठी हे लिंबू वापरून बघा कृषी विद्यापीठाच्या संशाेधकांनी विकसित केल्या प्रजाती
By निशांत वानखेडे | Published: October 28, 2023 07:53 PM2023-10-28T19:53:50+5:302023-10-28T19:53:58+5:30
Nagpur: कडक उन्हाळ्यात लिंबूचे शरबत मिळणे व जेवणात लाेणचे असणे ही भारतीयांचे मन प्रसन्न करणारी गाेष्ट. मात्र लिंबू चांगले नसले की विशेषत: गृहिणींना मन:स्ताप हाेताे. मात्र पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकाेल्याच्या संशाेधकांनी लिंबूच्या काही प्रजाती विकसित केल्या आहेत.
- निशांत वानखेडे
नागपूर - कडक उन्हाळ्यात लिंबूचे शरबत मिळणे व जेवणात लाेणचे असणे ही भारतीयांचे मन प्रसन्न करणारी गाेष्ट. मात्र लिंबू चांगले नसले की विशेषत: गृहिणींना मन:स्ताप हाेताे. मात्र पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकाेल्याच्या संशाेधकांनी लिंबूच्या काही प्रजाती विकसित केल्या आहेत, ज्यामुळे गृहिणींची तक्रार येणार नाही. यासाेबत दीडपट अधिक रस देणारी नागपुरी संत्र्याची प्रजातीही संशाेधकांनी शाेधली आहे.
पीडिकेव्हीच्या फळ विभागाचे सहयाेगी प्राध्यापक डाॅ. दिनेश पैठणकर यांच्या नेतृत्वात विकसित केलेल्या लिंबूच्या तीन व संत्र्याची एक प्रजाती शनिवारी एशियन सिट्रस काॅंग्रेसच्या प्रदर्शनात सादर केली. लिंबूच्या पीडीकेव्ही बहार, पीडीकेव्ही चक्रधर व पीडीकेव्ही तृप्ती तर संत्र्याची पीडीकेव्ही मॅंडेरिन यांचा समावेश आहे. यातील बहार लिंबू व संत्रा हे देशभरातील वेगवेगळ्या भागातून निवड केलेले तर इतर दाेन प्रजाती या म्युटंटद्वारे विकसित केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. १५ ते २० वर्षाच्या संशाेधनातून या प्रजाती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
विविध भागातून गाेळा केलेल्या प्रजातीतून निवडलेल्या सर्वाेत्तम प्रजातीपैकी असल्याचा दावा डाॅ. पैठणकर यांनी केला आहे. यापैकी संत्र्याची प्रजातीची महाराष्ट्रासह बाहेर राज्यात ५०० एकरापर्यंत लागवड हाेत असून बहार लिंबूची गुजरात, मध्य प्रदेश, काेलकाता व दिल्लीसह ५००० एकरात लागवड केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. चक्रधर लिंबू नवीन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या आहेत विशेषता
पीडीकेव्ही बहार : गुच्छ्यात लागतात, उत्पादन दुप्पट हाेते, आकाराने माेठा, बिजमुक्त व रसदार आहे.
पीडीकेव्ही चक्रधर : साल अतिशय पातळ असते, रसाचे प्रमाण ६० टक्के, चवीला गाेड, लिंबूला बिया नसतात, शरबतला कडवटपणा अतिशय कमी असताे आणि झाडाला काटे नसतात.
पीडीकेव्ही तृप्ती : लाेणच्यासाठी सर्वाेत्तम, साल जाड, गर अधिक असताे, रसाळ व जास्त काळ टिकताे.
पीडीकेव्ही संत्रा : उत्कृष्ठ रंग, फळे झाडाच्या मध्ये असतात, नागपुरी संत्र्यापेक्षा दीडपट अधिक रस, चवीला गाेड, बसकट व बट्टीदार फळे येतात व आकारही माेठा असताे. आंबिया बहारात बिज नसतात व मृग बहारात बिज असतात.
संत्रा गळतीसाठी संजीवके
शेतकऱ्यांना संत्रा गळतीच्या समस्येचा सामना करावा लागताे. यावर उपाय म्हणून विद्यापीठाने एन-अटका, ब्रासिलाेनाईड व फाॅलिक अॅसिडच्या मिश्रणातून संजीवक तयार केले असून ते संत्रा गळती थांबविण्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल, असा दावा त्यांनी केला.