नागपुरात तूर डाळ शंभरीकडे ! ग्राहकांचे कंबरडे मोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 08:57 PM2019-05-15T20:57:59+5:302019-05-15T20:59:59+5:30
सामान्यांपासून उच्चभ्रू नागरिकांपर्यंत सर्वांच्या ताटातील महत्त्वाचा पदार्थ म्हणून गणल्या जाणाऱ्या तूर डाळीचे भाव यंदा ग्राहकांचे कंबरडे मोडणार आहे. दीड महिन्यातच क्विंटलमागे दोन हजार रुपयांची वाढ होऊन ठोकमध्ये दर्जानुसार भाव प्रति किलो ८५ ते ८७ रुपयांवर पोहोचले आहेत. किरकोळमध्ये ९० ते ९५ रुपयांत विक्री सुरू आहे. डाळीप्रमाणेच तुरीचे भावही वाढले आहेत. डाळीची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. पुढेही भाववाढीची शक्यता असल्याचे मत व्यापाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सामान्यांपासून उच्चभ्रू नागरिकांपर्यंत सर्वांच्या ताटातील महत्त्वाचा पदार्थ म्हणून गणल्या जाणाऱ्या तूर डाळीचे भाव यंदा ग्राहकांचे कंबरडे मोडणार आहे. दीड महिन्यातच क्विंटलमागे दोन हजार रुपयांची वाढ होऊन ठोकमध्ये दर्जानुसार भाव प्रति किलो ८५ ते ८७ रुपयांवर पोहोचले आहेत. किरकोळमध्ये ९० ते ९५ रुपयांत विक्री सुरू आहे. डाळीप्रमाणेच तुरीचे भावही वाढले आहेत. डाळीची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. पुढेही भाववाढीची शक्यता असल्याचे मत व्यापाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
तुरीचे पीक फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात आले. तूर डाळ एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बाजारात मुबलक प्रमाणात विक्रीस आली, तेव्हा ठोक बाजारात ६५ ते ६७ रुपये किलो भावाने विक्री झाली. दीड महिन्यातच भाव ८५ ते ८७ रुपयांवर पोहोचले आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी भाव प्रति क्विंटल २०० रुपयांनी घसरण झाल्याची माहिती धान्य बाजारातील ठोक विक्रेते व कॅन्व्हायसर रमेश उमाठे यांनी लोकमतशी बोलताना दिली. आंब्याच्या हंगामामुळे मे महिन्यात भाव वाढणार नाही, असे त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी तुरीला भाव न मिळाल्यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी तुरीच्या पिकाकडे दुर्लक्ष करून कापूस पिकावर लक्ष केंद्रित केले. कमी पावसामुळे यावर्षी तुरीचे पीक कमी येण्याचा कृषी तज्ज्ञांचा अंदाज खरा ठरला. सर्व बाबी हेरून व्यापाऱ्यांनी डाळीचे भाव वाढविण्यास सुरुवात केली आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास तूर डाळ पुन्हा १०० रुपयांचा आकडा गाठण्याची शक्यता आहे.
उत्पादन कमी, मागणी जास्त
तीन वर्षांपूर्वी तूर डाळीचे भाव प्रति किलो १८० ते २०० रुपयांपर्यंत पोहोचले होते. वाढीव भावामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले होते. भाव सामान्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न केले होते, शिवाय आयातही सुरू केली होती. दोन वर्षांपूर्वी तुरीचे उत्पादन जास्त झाल्यामुळे दोन महिन्यातच तूर डाळीचे भाव ठोक बाजारात दर्जानुसार ५० रुपयांपर्यंत कमी झाले होते. भाव कमी झाल्यानंतरही ग्राहकांकडून फारशी मागणी नव्हती. या सर्व घडामोडीचा फटका व्यापाऱ्यांना बसला होता. अनेक दाल मिल बंद पडल्या. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तूर डाळीचा साठा केलाच नाही. यावर्षी पुन्हा पीक कमी झाले आहे. वाढत्या मागणीमुळे भाव पुन्हा वाढले आहेत.
शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आधारभूत किमतीत वाढ
गेल्या वर्षी तुरीला भाव कमी मिळाल्यामुळे केंद्र सरकारने आधारभूत किंमत ५,९०० रुपयांपर्यंत वाढविली होती. एवढ्या किमतीत तूर खरेदी करणारा व्यापारी वाढीव भावातच डाळ विकणार आहे. शिवाय तुरीचे पीक कमी आल्यामुळे भाव वाढण्याची शक्यता आहे. दरवाढीमुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या महिन्याच्या बजेटवर ताण येणार आहे.