नागपुरात ई तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 10:10 PM2018-11-08T22:10:53+5:302018-11-08T22:12:17+5:30
दिवाळीत प्रवाशांकडून अधिक पैसे आकारून ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दोन आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ५६ हजारांच्या ई तिकिटांसह १ लाख ३० हजार ५०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीत प्रवाशांकडून अधिक पैसे आकारून ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दोन आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ५६ हजारांच्या ई तिकिटांसह १ लाख ३० हजार ५०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील आरपीएफचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पाण्ड्येय यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गणेश गरकल यांच्या नेतृत्वात सतीश इंगळे, विनोद उईके, राहुल सिंग, पी. एन. रायसेडाम, प्रदीप गाढवे, ईशांत दीक्षित, अश्विन पवार यांच्या चमूने बुटीबोरी परिसरात अवैधरीत्या ई तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांविरुद्ध कारवाई केली. यात आरोपी सोनु कुमार कृष्णा केसरी हा बधानी नेट कॅफे, मा कॉम्प्लेक्स वॉर्ड नं. ३, सत्यम कॉम्प्लेक्स याच्याजवळ १२ ई तिकीट किंमत १६८५५, यापूर्वी बनविलेले ६ ई तिकीट किंमत ७४२०, संगणक २० हजार, प्रिंटर ८ हजार मोबाईल ५ हजार असा एकूण ५७ हजार २७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसऱ्या घटनेत अमोल देवराव काकडे देव कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, रामकवती कॉम्प्लेक्स, वॉर्ड नं. ३, मेन रोड बुटीबोरी याच्याकडून ३ ई तिकीट किंमत १९९७, यापूर्वी काढलेले १८ ई तिकीट किंमत ३१ हजार २३२, लॅपटॉप ३० हजार, प्रिंटर १० हजार, असा एकूण ७३ हजार २३२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान अमोल काकडे हा आरोपी फरार आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध रेल्वे अॅक्ट १४३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.