आधी घरात मारलं अन् मग प्रेत पुरलं; पोलीस ठाण्यावर मोर्चा जाताच खुनाचं रहस्य उलगडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 09:49 PM2021-09-10T21:49:02+5:302021-09-10T21:52:49+5:30

उमरेडमध्ये पुन्हा क्षुल्लक कारणावरून झाला खून

in nagpur two brothers killed one buried his dead body | आधी घरात मारलं अन् मग प्रेत पुरलं; पोलीस ठाण्यावर मोर्चा जाताच खुनाचं रहस्य उलगडलं

आधी घरात मारलं अन् मग प्रेत पुरलं; पोलीस ठाण्यावर मोर्चा जाताच खुनाचं रहस्य उलगडलं

Next

उमरेड (नागपूर) : पैशांच्या वाटणीतून झालेल्या क्षुल्लक कारणावरून वाद उद्भवला. रागाच्या भरात आरोपींनी घरातच रेल्वेरूळाच्या लोखंडी तुकड्यावर डोके आपटून ठार केले. रात्रभर प्रेत घरीच ठेवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे मृतदेह पोत्यात भरून तो सायकलवरून नेला आणि प्रेत पुरले. उमरेड येथील हा खळबळजनक प्रकार शक्रवारी नागरिकांच्या सतर्कतेमुळे तब्बल पाच दिवसांनंतर उजेडात आला.

ग्याना रूपराव शेंडे (२३, रा. रेल्वे झोपडपट्टी, उमरेड) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी उमरेड पोलिसांनी विजय ऊर्फ गोलू सखाराम मांडले आणि त्याचा भाऊ सुरजित सखाराम मांडले (रा. झोपडपट्टी, उमरेड) या दोन आरोपींना अटक केली आहे. रविवारी, ५ सप्टेंबर दुपारी ४ वाजताच्या दरम्यानची ही घटना असून उमरेड सेवामार्गावरील आंबराई परिसरातील एका निर्जनस्थळी असलेल्या केबल वायरच्या खड्ड्यात प्रेत पुरण्यात आले होते.

मृत ग्याना शेंडे हा लोखंडी साहित्याची जुळवाजुळव करत विक्री करण्याचा धंदा करत होता. आरोपी गोलू व सुरजित मांडले माती खोदकाम करतात. सदर दोन्ही भाऊ मृत ग्यानाचे मित्र होते. तिघेही लोखंडी साहित्याची आपसात वाटाघाटी करत विल्हेवाट लावायचे. रविवारी, ५ सप्टेंबरला दुपारच्या सुमारास आरोपी गोलू आणि सुरजित यांच्या घरी मृत ग्याना शेंडे हा पार्टी करत होता. याच दरम्यान वाटाघाटीच्या पैशांवरून ठिणगी उडाली आणि दोन्ही आरोपी भावांनी ग्याना शेंडे याला ठार मारले, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे यांनी दिली.

उमरेड पोलीस ठाण्यात ३०२, २०१, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी आरोपींची संख्या वाढण्याची संभावना व्यक्त होत आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक चमू पोहोचत नमूने घेण्यात आले. नागपूर येथे शवविच्छेदनासाठी मृतदेह रवाना करण्यात आला.

हरवल्याची तक्रार केली
मृत ग्यानाचा मोठा भाऊ श्याम रूपराव शेंडे याने भाऊ हरविल्याची तक्रार सोमवारी ६ सप्टेंबरला दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी नेहमीप्रमाणे तपास करू असे सांगितले. दरम्यान, दोन दिवसांतच परिसरात कुजबुज सुरू झाली. झोपडपट्टीमधील नागरिक वारंवार पोलीस ठाण्यात येऊ लागले. ग्याना शेंडे याचा खून झाला असून आम्हास आरोपी गोलू व सुरजित यांच्यावर संशय असल्याचे सांगितले. त्यानंतरही या प्रकरणाची फारशी दखल घेतली गेली नाही, असा आरोप झोपडपट्टीवासीयांचा आहे.

मोर्चा गेला, गूढ उकलले
शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास नगरसेवक नागेश मानकर, रामसिंग लोंढे, गणेश पवार, शेखर शिवनकर, गरीबा मानकर, बबन मानकर, नेवापाल पात्रे यांच्यासह झोपडपट्टीमधील नागरिकांनी पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांना बोलवा, असा हट्ट नागरिकांनी केला. तब्बल चार तास चर्चा झाली. नागपूर जिल्हा ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर उमरेड येथे पोहोचले. नागरिकांनी खून झाल्याचा संशय व्यक्त करत निवेदन दिले. आरोपींची नावेही सांगितली. दरम्यान, काही काळ नारेबाजीही झाली. अशातच पोलिसांचा एक चमू संशयित आरोपींना पकडण्यासाठी रवाना करण्यात आले. लागलीच सहा जणांना ठाण्यात आणले. पोलिसी खाक्या दाखविण्यात आला. दोन्ही आरोपींनी गुन्हा कबूल केला. नागरिकांनी सतर्कता दाखविली नसती तर प्रकरण प्रेतासह दफन झाले असते, अशा प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहेत.

Web Title: in nagpur two brothers killed one buried his dead body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.