नागपुरात सख्ख्या भावांनी केली दगाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 01:17 AM2018-05-18T01:17:45+5:302018-05-18T01:18:03+5:30
अगरबत्तीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापारी बंधूंनी त्यांच्या एका सख्ख्या भावाच्या नावाने बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेत खाते उघडले आणि १२ वर्षांत तब्बल २ कोटी, ७ लाखांचा व्यवहार केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अगरबत्तीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापारी बंधूंनी त्यांच्या एका सख्ख्या भावाच्या नावाने बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेत खाते उघडले आणि १२ वर्षांत तब्बल २ कोटी, ७ लाखांचा व्यवहार केला. १२ वर्षांनंतर हा गैरप्र्रकार उघड झाल्यानंतर शंकर भगवानदास सुगंध (वय ४२, रा. छापरूनगर, सोसायटी गरोबा मैदान) यांनी त्यांचे सख्खे भाऊ ईश्वर भगवानदास सुगंध (वय ४४) आणि हिरालाल भगवानदास सुगंध (वय ४८, रा. दोघेही जुना बगडगंज) यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार केली.
शंकर सुगंध यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या फोटोचा गैरवापर करीत त्यांच्या दोन भावांनी १७ डिसेंबर २००६ रोजी नागपूर नागरिक सहकारी बँकेत खाते उघडले. त्यानंतर त्या खात्याच्या आधारे एलआयसीचे ६३,०१६ रुपये काढून घेतले. हे दोन गैरप्रकार झाल्यानंतर ईश्वर आणि हिरालाल या दोघांनी गेल्या १२ वर्षांत २ कोटी, ७ लाख, १९,२०० रुपयांचा व्यवहार शंकर सुगंध यांच्या नावे केला. या सर्व गैरप्रकारापासून अनभिज्ञ असलेल्या शंकर सुगंध यांना दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या नावे होत असलेल्या गैरव्यवहाराची माहिती कळाली. त्यानंतर त्यांनी आपल्या भावांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे शंकर सुगंध यांनी तहसील ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
कोटी नव्हे, लाखाचा गैरव्यवहार ?
रात्री उशिरा या संबंधाने तहसील ठाण्यातील चौकशी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्यवहार २ कोटी नव्हे तर २ लाख, १९ हजारांचा व्यवहार असल्याचे ते म्हणाले. आरोपींची चौकशी केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.