Corona Virus in Nagpur; नागपुरात दोन महिलांनी उडवली होती आरोग्य यंत्रणेची झोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 06:48 PM2020-03-29T18:48:03+5:302020-03-29T18:48:59+5:30
बाधित रुग्णाच्या घरी घरकाम करणाऱ्या दोन महिलांना लक्षणे आढळून आली. शनिवारी त्यांना मेयोत दाखल केले. नमुने तपासणीसाठी पाठविले. या दोन्ही महिला कोरोनाबाधित रुग्णाच्या वसाहतीलगत वेगवेगळ्या झोपडपट्टीत राहतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बाधित रुग्णाच्या घरी घरकाम करणाऱ्या दोन महिलांना लक्षणे आढळून आली. शनिवारी त्यांना मेयोत दाखल केले. नमुने तपासणीसाठी पाठविले. या दोन्ही महिला कोरोनाबाधित रुग्णाच्या वसाहतीलगत वेगवेगळ्या झोपडपट्टीत राहतात. ही वस्ती दाटीवटीने वसलेली. त्या पॉझिटिव्ह आल्यास मोठा धोका होणार होता. यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणेचे लक्ष त्यांच्या नमुन्यांचा अहवालावर होते. रविवारी सकाळीच याबाबत मेयो प्रशासनाला विचारणा झाली. अहवाल निगेटिव्ह असल्याचे कळताच सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला. एक मोठा दिलास आरोग्य यंत्रणेला मिळाला.
दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असलेले दोघे पॉझिटिव्ह येताच त्यांचे कुटुंबातील सदस्य, घरात व दुकानात काम करणारे कर्मचारी, मित्र व शेजाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यात ५० वर संबंधितांचे नमुने घेण्यात आले. यात सात जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरात घरकाम करणाºया दोन महिलांचे नमुने पहिल्या दोन टप्प्यात घेण्यात आले नव्हते. आरोग्य यंत्रणेला याची माहिती मिळताच त्यांनी शनिवारी मेयोच्या प्रयोगशाळेत दाखल केले. या महिला झोपडपट्टीत राहणाºया आहेत. या दोन्ही झोपडपट्ट्या दाट घरांच्या आहेत. यामुळे अहवालात या दोघी पॉझिटिव्ह आल्यास मोठ्या धोक्याची शक्यता होती. त्यांना थोडी फार लक्षणेही असल्याने अघटित तर घडणार नाही ना, या चिंतेत आरोग्य यंत्रणा होती. शनिवारी रात्री त्यांच्या अहवालाबाबत मेयोला विचारपूसही झाली. परंतु नमुन्यांचा अहवाल रविवारी सकाळी येणार होता. संपूर्ण यंत्रणा त्यांच्या अहवालाच्या प्रतीक्षेत होती. या महिला पॉझिटिव्ह आल्यास काय उपाययोजना करावयाच्या तेही प्राथमिक स्वरूपात ठरले होते. रविवारी सकाळीच आरोग्य यंत्रणेचे फोन मेयो प्रशासनला गेले. त्यांनी दोन्ही महिलेचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगताच मोठा दिलासा मिळाला. सध्या या दोन्ही महिलांना मेयोतून सुटी देऊन पुढील १४ दिवस घरीच थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले जाणार आहे.