नागपूर नियंत्रणात, ग्रामीण नियंत्रणाबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:08 AM2021-05-08T04:08:37+5:302021-05-08T04:08:37+5:30
नागपूर : कोरोना नियंत्रणात येत असल्याचे मागील सहा दिवसांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. परंतु हे नियंत्रण शहरापुरतेच मर्यादित असून, ...
नागपूर : कोरोना नियंत्रणात येत असल्याचे मागील सहा दिवसांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. परंतु हे नियंत्रण शहरापुरतेच मर्यादित असून, ग्रामीण अद्यापही नियंत्रणाबाहेर आहे. शहरात पॉझिटिव्हीटीचा दर १४ टक्के तर ग्रामीणमध्ये ३३ टक्के आहे. शुक्रवारी नागपूर जिल्ह्यात ४३०६ रुग्ण व ७९ मृत्यूची नोंद झाली. यात शहरातील २२५५, तर ग्रामीणमधील २०३९ रुग्ण आहेत.
नागपूर जिल्ह्यात फेब्रुवारीपासून दुसरी लाट पसरू लागली. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली. दैनंदिन रुग्णांची संख्या सुरुवातीला ५०० नंतर हजारावर गेली. मार्च महिन्याची सुरुवात हजारावर रुग्णाने झाली. महिन्याच्या अखेरपर्यंत दैनंदिन संख्या चार हजारावर गेली. परंतु शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये कमी रुग्णांची नोंद होत होती. परंतु एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णसंख्येचे नवे विक्रम स्थापन होताच ग्रामीणमध्येही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली. मागील सहा दिवसांत चाचण्यांच्या तुलनेत शहरात कमी रुग्ण पॉझिटिव्ह येत असताना ग्रामीणमध्ये मात्र रुग्णांची संख्या कायम असल्याचे चित्र आहे. शुक्रवारी शहरात १६,२६३ चाचण्यांमधून २२५५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. ग्रामीणमध्ये ६०३५ चाचण्यांमधून २०३९ बाधित रुग्ण आढळून आले. यावरून ग्रामीणमध्ये प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-चाचण्या वाढविण्याची गरज
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवून जास्तीत जास्त रुग्णापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. एप्रिल महिन्यात २९ हजारांपर्यंत चाचण्यांची संख्या गेली होती. मागील सहा दिवसांत चाचण्यांची संख्या २० ते २२ हजारांच्या घरात होत आहे. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी शहर व ग्रामीणमध्ये चाचण्या वाढविण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-मागील सात दिवसांतील पॉझिटिव्हीचा दर
दिनांक शहर ग्रामीण
१ मे २३ टक्के ४१ टक्के
२ मे १७ टक्के ६७ टक्के
३ मे १८ टक्के ५२ टक्के
४ मे १८ टक्के २९ टक्के
५ मे १६ टक्के २९ टक्के
६ मे १७ टक्के ३४ टक्के
७ मे १४ टक्के ३३ टक्के