नागपुरात भूमिगत केबल चोर अण्णा टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 10:32 PM2018-09-27T22:32:21+5:302018-09-27T22:33:39+5:30
रात्रीच्या वेळी भूमिगत केबल चोरणारी आंध्र प्रदेशातील चोरट्यांची अण्णा टोळी गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली. या टोळीकडून पोलिसांनी ४१० किलोग्राम केबल आणि मोबाईलसह १ लाख, ७० हजारांचे साहित्य जप्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रात्रीच्या वेळी भूमिगत केबल चोरणारी आंध्र प्रदेशातील चोरट्यांची अण्णा टोळी गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली. या टोळीकडून पोलिसांनी ४१० किलोग्राम केबल आणि मोबाईलसह १ लाख, ७० हजारांचे साहित्य जप्त केले.
बुधवारी रात्री गुन्हे शाखेचे पथक मंगळवारी बाजार परिसरात गस्तीवर असताना जी. दुर्गाप्रसाद विरास्वामी (वय ३८), जी. नागराजू नागेश्वरराव (वय ३६), जी. सुब्बाराव रामालू (वय ३४), व्ही डॅनियल चिन्नापाई (वय ३६), टी. रामूचेरास्वामी (वय २५), व्ही. गोपीशशी नारायण (वय २०) आणि जी. रामबाबू चिरय्या (वय ३०) हे सर्व संशयास्पद अवस्थेत फिरताना दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चाकू, कटर, लोखंडी सब्बल, दांडा आढळला. गुन्हे शाखेत नेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी रात्रीच्या वेळी भूमिगत केबल चोरी करून ती विकत असल्याची पोलिसांकडे कबुली दिली. त्यांनी बाजारात लपवून ठेवलेली ४१० किलो केबल (किंमत १ लाख, ६० हजार) पोलिसांच्या हवाली केली. या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली.
लॉजमध्ये मुक्काम
उपरोक्त टोळीतील चोरटे आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील अंमलापूरचे रहिवासी आहेत. ते यापूर्वी नागपुरात भूमिगत केबल लाईन टाकण्याच्या कामासाठी आले होते. काही दिवसांपूर्वी मेट्रो आणि बीएसएनएलच्या भूमिगत केबल टाकण्याचे काम शहरात करण्यात आले. त्याची माहिती असल्यामुळे ही टोळी नागपुरात आली. मेट्रोत कामाला आहोत, असे सांगून हे चोरटे रेल्वेस्थानकाजवळच्या एका लॉजमध्ये राहत होते. त्यांनी आतापर्यंत कुठली कुठली केबल खोदून काढली आणि कुठे विकली, त्याची पोलीस चौकशी करीत आहेत.
ती केबल सीताबर्डीतील
अण्णा टोळीने मंगळवारी रात्री बीएसएनएल कार्यालयाजवळून चोरली होती. रात्री १२ वाजतापासून हे चोरटे पहाटे ५ वाजेपर्यंत सब्बल, फावडे आणि कटरच्या साह्याने बीएसएनएलची भूमिगत केबल खोदून काढली. ही केबल त्यांनी लपवून ठेवली होती. याप्रकरणी सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर चोरट्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली.