नागपुरात संयुक्त आघाडीसोबत, तर अमरावतीत स्वबळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:12 AM2021-09-04T04:12:52+5:302021-09-04T04:12:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर असून आरपीआयच्या सर्व गटांनी एकत्र येत संयुक्त रिपब्लिकन आघाडी स्थापन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर असून आरपीआयच्या सर्व गटांनी एकत्र येत संयुक्त रिपब्लिकन आघाडी स्थापन केली. त्यात गवई गटाबाबत शंका उपस्थित केली जात होती. मात्र आरपीआय (गवई)चे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई यांनी नागपुरात संयुक्त रिपब्लिकन आघाडी सोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र अमरावतीत आपण स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राजेंद्र गवई हे दीक्षाभूमी येथील बैठकीसाठी आले असता, लोकमतशी बोलत होते. गवई म्हणाले, नागपुरात सर्व गटांनी एकत्र यावे, अशी समाजाची भावना आहे. आम्ही समाजाच्या भावनेचा आदर करून आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र अमरावतीमध्ये गत वर्षभरापासून आम्ही तयारी करीत आहोत. त्यात कोणत्याही पक्षासोबत आघाडी न करता स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मात्र राज्याबाबत बोलायचे झाल्यास वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्याशी भेट घेऊन आघाडीबाबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.