नागपूर विद्यापीठ : २६९ पदके-पारितोषिकांवर संक्रांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 08:51 PM2018-04-23T20:51:22+5:302018-04-23T20:51:33+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विविध अभ्यासक्रमातील गुणवंतांना सद्यस्थितीत ३४३ पदके, पारितोषिके प्रदान करण्यात येतात. मात्र अनेक वर्षांपूर्वी दानदात्यांनी जमा केलेल्या अनामत रकमेच्या आधारे आता पदके बनविणे परवडण्याजोगे राहिलेले नाही. त्यामुळे पुढील वर्षीपासून पदकांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. विद्यापीठाने २६९ पदके व पारितोषिकांच्या दानदात्यांची यादी जाहीर केली आहे. महिनाभरात व्यवस्थापन परिषदेने ठरविलेल्या रकमेनुसार फरकनिधी भरण्याची मुदत त्यांना देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विविध अभ्यासक्रमातील गुणवंतांना सद्यस्थितीत ३४३ पदके, पारितोषिके प्रदान करण्यात येतात. मात्र अनेक वर्षांपूर्वी दानदात्यांनी जमा केलेल्या अनामत रकमेच्या आधारे आता पदके बनविणे परवडण्याजोगे राहिलेले नाही. त्यामुळे पुढील वर्षीपासून पदकांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. विद्यापीठाने २६९ पदके व पारितोषिकांच्या दानदात्यांची यादी जाहीर केली आहे. महिनाभरात व्यवस्थापन परिषदेने ठरविलेल्या रकमेनुसार फरकनिधी भरण्याची मुदत त्यांना देण्यात आली आहे.
नागपूर विद्यापीठात काही दानदात्यांनी अगदी १९३० साली पुरस्कारासाठी निधी दिला होता. त्याकाळी मोठी वाटणारी अनामत रकमेची आताची किंमत फारच कमी आहे. त्या रकमेच्या आधारे दरवर्षी पदकांची निर्मिती करण्यासाठी विद्यापीठालाच निधी द्यावा लागत आहे. त्यामुळे विद्यापीठाने दानदात्यांना पत्र लिहिले व आताच्या बाजारभावाच्या हिशेबाने सुधारित रकमेच्या धनादेशाची मागणी केली. सुवर्णपदकांसाठी ७५ हजार तर रौप्यपदकांसाठी ५० हजार रुपयांची रक्कम ठरविण्यात आली. जर सुधारित धनादेश देणे शक्य नसेल तर मूळ अनामत रक्कम दानदात्यांचे कुटुंबीय घेऊन जाऊ शकतात, असेदेखील स्पष्ट करण्यात आले होते.
विद्यापीठाने यासंबंधात ३४३ दानदात्यांना पत्र पाठविले. यातील ३५ जणांनी अतिरिक्त रक्कम भरण्याची तयारी दाखविली होती. तर १७ जणांनी अनामत रक्कम परत मागितली होती. २२ जणांचा पत्ता विद्यापीठाकडे नाही. २६९ जणांनी कुठलेही उत्तर पाठविले नाही. या २६९ सर्व पदके-पारितोषिकांच्या दानदात्यांची यादीच विद्यापीठाने संकेतस्थळावर जारी केली आहे. अनेक दानदात्यांनी २१००, २२०० रुपयांची अनामत रक्कम अनेक वर्षांअगोदर भरली होती. नव्या नियमांमुळे त्यांना सुवर्णपदकासाठी ७२८०० रुपये भरावे लागणार आहेत.
महाविद्यालये, विभागांचा समावेश
नागपूर विद्यापीठातील काही पदव्युत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयांकडूनदेखील पदके-पारितोषिके पुरस्कृत करण्यात आली आहेत. त्यांची नावेदेखील या यादीत आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाच्या काही माजी अधिकाऱ्यांनादेखील फरकाची रक्कम भरावी लागणार आहे. नागपूर महानगरपालिकेचादेखील यात समावेश आहे.
१० पारितोषिके देणाऱ्या दानदात्याला फटका
एका दानदात्याने १० पारितोषिके पुरस्कृत केली होती व त्यासाठी १ लाख २७ हजार रुपयांची अनामत रक्कम भरली होती. परंतु नवीन नियमांनुसार प्रति पारितोषिक ५० हजार याप्रमाणे त्यांना एकूण पाच लाख रुपये भरणे अपेक्षित आहे. रकमेचा फरकनिधी हा ३ लाख ७३ हजार रुपये इतका आहे. तो त्यांना महिनाभरात भरावा लागणार आहे.
म्हणून उचलले पाऊल
विद्यापीठाला अनिच्छेने हे पाऊल उचलावे लागत आहे. मात्र बाजारभाव व मूळ अनामत रकमेवरील व्याज यांची सांगड घालणे कठीण झाले आहे. शिवाय आता करदेखील वाढले आहेत व ठेवींवरील व्याज घटले आहे. त्यामुळे आम्ही दानदात्यांना आवाहन केले आहे, असे कुलगुरू डॉ.सिद्धार्थ विनायक काणे यांनी स्पष्ट केले.