नागपूर विद्यापीठ : ३६ महाविद्यालयांचे संलग्नीकरण रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 11:08 PM2019-06-28T23:08:06+5:302019-06-28T23:09:09+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नियमांचे पालन न करणाऱ्या ३६ महाविद्यालयांना धक्का दिला आहे. या महाविद्यालयांचे संलग्नीकरण २०१९-२० पासून रद्द करण्यात आले आहे. महाविद्यालयांमध्ये संबंधित अभ्यासक्रमांसाठी नियमित शिक्षक, सुविधा नसणे, संलग्नीकरणासाठी अर्ज न करणे तसेच ‘एलईसी’ची (लोकल इन्क्वायरी कमिटी) प्रक्रिया न राबविल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये असे सांगत विद्यापीठाने यांची यादीच संकेतस्थळावर जाहीर केली आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे विद्यापीठाने ३६ पैकी अवघ्या २८ महाविद्यालयांचीच नावे ‘अपलोड’ केली आहेत. उर्वरित नावे का सार्वजनिक करण्यात आली नाहीत, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नियमांचे पालन न करणाऱ्या ३६ महाविद्यालयांना धक्का दिला आहे. या महाविद्यालयांचे संलग्नीकरण २०१९-२० पासून रद्द करण्यात आले आहे. महाविद्यालयांमध्ये संबंधित अभ्यासक्रमांसाठी नियमित शिक्षक, सुविधा नसणे, संलग्नीकरणासाठी अर्ज न करणे तसेच ‘एलईसी’ची (लोकल इन्क्वायरी कमिटी) प्रक्रिया न राबविल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये असे सांगत विद्यापीठाने यांची यादीच संकेतस्थळावर जाहीर केली आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे विद्यापीठाने ३६ पैकी अवघ्या २८ महाविद्यालयांचीच नावे ‘अपलोड’ केली आहेत. उर्वरित नावे का सार्वजनिक करण्यात आली नाहीत, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
विविध कारणांनी विद्यापीठाने १७ मे रोजी १२९ महाविद्यालयांतील विविध अभ्यासक्रमांवर प्रवेशबंदी लावली. त्यानंतर १२ दिवसांनी आणखी तीन महाविद्यालयांतील प्रथम वर्षाचे प्रवेश गोठविण्यात आले होते. नागपूर विद्यापीठात एकूण संलग्नित महाविद्यालयांची संख्या ५८४ इतकी आहे. यातील १३२ महाविद्यालयांतील विविध अभ्यासक्रमांत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाही असे त्यावेळी विद्यापीठाने स्पष्ट केले होते. यानंतर काही महाविद्यालयांनी अटींचे पालन केले व त्यांच्यावरील बंदी उठविण्यात आली.
मात्र ३६ महाविद्यालयांनी विद्यापीठाशी कुठलाही संपर्क ठेवला नाही. बहुतांश महाविद्यालयांनी गेल्या तीन वर्षांपासून विद्यापीठासोबत कुठलाही पत्रव्यवहार केलेला नाही. विद्यापीठाने महाविद्यालयांना वारंवार संधी दिली. मात्र तरीदेखील काहीच सुधारणा न झाल्याने १० जून रोजी विद्या परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार या महाविद्यालयांचे संलग्नीकरणच रद्द करण्यात आले आहे. मागील वर्षी ६ डिसेंबर रोजी विद्यापीठाने ५८ महाविद्यालयांचे संलग्नीकरण रद्द केले होते.
प्रवेश घेतल्यास विद्यार्थी जबाबदार
३६ महाविद्यालयांचा विद्यापीठाशी कुठलाही संबंध राहणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तेथे प्रवेश न घेण्याची खबरदारी बाळगावी, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. जर कुणी येथे प्रवेश घेतला तरी सर्वस्वी जबाबदारी त्याचीच असेल असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
विद्यापीठाकडून लंपडाव?
विद्यापीठाने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये ३६ महाविद्यालयांचे संलग्नीकरण रद्द करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र यादी देताना २८ महाविद्यालयांचीच देण्यात आली आहे. २२ व्या महाविद्यालयानंतर थेट ३१ व्या महाविद्यालयाचे नाव देण्यात आले आहे. असा प्रकार का करण्यात आला आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाविद्यालयांची नावे
नागपूर जिल्हा
- रमेश धवड शारीरिक शिक्षण महाविद्यालय, राजीवनगर
- एम.ए.टी.ई.एस कॉलेज, अमरावती मार्ग
- नितीन राऊत महाविद्यालय, पांजरा, कोराडी मार्ग
- शिंदे महिला अध्यापक महाविद्यालय, काटोल
- इंदिरा गांधी कॉलेज ऑफ एज्युकेशन, बुटीबोरी
- प्रतिकान कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशन फॉर बी.एड.,बुटीबोरी
- महात्मा फुले वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, रेशीमबाग
- माईंडस्पेस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सदर
- राणी लक्ष्मीबाई शारीरिक शिक्षण महाविद्यालय, सावरगाव, नरखेड
- यशोदा भोयर कॉलेज ऑफ एज्युकेशन, चाफेगडी, कुही
- सागर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅन्ड कॉम्प्युटर एज्युकेशन, भिवापूर
- सेठ सुभाषबाबू गोवर्धनदास पालीवार अध्यापक महाविद्यालय, पारशिवनी
- विद्यादीप कॉलेज, लोहिया ग्राऊंड, कामठी
- विद्याविहार कॉलेज, ऑरेंज प्लाझा, काटोल
- नागोरावजी मोवाडे कला महाविद्यालय, नांदागोमुख, सावनेर
- गुरुकूल महाविद्यालय, भिवापूर
- वच्छलाबाई मामुलकर कॉलेज ऑफ लायब्ररी सायन्स, उमरेड
- रियल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल स्टडीज्, वर्धा मार्ग
- गुरुकूल कॉलेज, धापेवाडा, कळमेश्वर
भंडारा जिल्हा
- वैनगंगा इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स स्टडीज, साकोली
- मनोहरभाई पटेल कॉलेज ऑफ एज्युकेशन, भंडारा
- अरुण मोटघरे मास्टर ऑफ एज्युकेशन, कोसरा
- नर्मदाबाई ठवकर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅन्ड मॅनेजमेन्ट, भंडारा
वर्धा
- प्रमोदबाबू शेंडे कला व वाणिज्य महाविद्यालय, सिंदी रेल्वे, सेलू
- अग्निहोत्री कॉलेज ऑफ एज्युकेशन, बापूजी वाडी
- इंदुमती वानखेडे शिक्षण महाविद्यालय, सेवाग्राम
- नारायणराव वाघ आर्टस् अॅन्ड कॉम्प्युटर सायन्स कॉलेज, पिंपळखुटा, आर्वी
- सुभेदार रामजी आंबेडकर शारीरिक शिक्षण महाविद्यालय, हिंगणघाट