नागपूर विद्यापीठ : ऑफलाईन’ परीक्षेसाठी ९० टक्केतयारी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 10:55 PM2020-08-28T22:55:48+5:302020-08-28T22:57:02+5:30
अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हालचाली वाढल्या आहेत. उन्हाळ्यातच नागपूर विद्यापीठाने ‘ऑफलाईन’ परीक्षांसाठी तयारी करून ठेवली होती. सुमारे ७५ हजार परीक्षार्थी अंतिम वर्षाच्या परीक्षांना सहभागी होतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हालचाली वाढल्या आहेत. उन्हाळ्यातच नागपूर विद्यापीठाने ‘ऑफलाईन’ परीक्षांसाठी तयारी करून ठेवली होती. सुमारे ७५ हजार परीक्षार्थी अंतिम वर्षाच्या परीक्षांना सहभागी होतील. या परीक्षांसाठी ९० टक्के तयारी पूर्ण झाली असून राज्य शासनाच्या दिशानिर्देशांची प्रतीक्षा असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर उन्हाळी परीक्षांची तयारी मार्च महिन्यातच झाली होती. काही पेपरचे ‘मॉडरेशन’ बाकी होते. मात्र ती प्रक्रियादेखील ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत झाली. सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका तयार आहेत. आता केवळ वेळापत्रक तयार करणे व परीक्षा केंद्रांची नावे निश्चित करणे ही प्रक्रिया बाकी आहे. ही प्रक्रिया राज्य शासनाचे निश्चित दिशानिर्देश आल्यानंतरच होऊ शकणार आहे.
यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांना संपर्क केला असता त्यांनी आमची तयारी पूर्ण असल्याचे सांगितले. केवळ काही प्रक्रिया बाकी असून त्या राज्य शासनाच्या निर्देशानंतरच पूर्ण करण्यात येतील,असे त्यांनी स्पष्ट केले.
‘ऑनलाईन’ परीक्षा झाल्यास अडचण
‘कोरोना’चा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य शासनाने जर ‘ऑनलाईन’ परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला, तर मात्र विद्यापीठाची अडचण होऊ शकते. ‘ऑनलाईन’ परीक्षांची ‘स्कीम’ तसेच प्रश्नपत्रिका निश्चित करायला दीड महिन्यांचा कालावधी लागू शकेल. शिवाय परीक्षा आयोजित करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचादेखील अभाव आहे. ग्रामीण भागात तर परीक्षा केंद्र शोधतानादेखील अडचण होणार आहे.